“क्षुधा तृप्तीसाठी हाच समाधानाचा मंत्र”; सविता पाटील ठाकरे

“क्षुधा तृप्तीसाठी हाच समाधानाचा मंत्र”; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_

कोलकाता…पश्चिम बंगालची राजधानी, या शहरातील ‘ते’ चित्र माझ्या मनाला खोल जखमा करत होते. दहा-बारा वर्षाची पाच, सहा मुलं रात्रीच्या वेळी सार्वजनिक कचराकुंडी जवळ काहीतरी शोधत होते, आधी मी दुर्लक्ष केले. कारण कचऱ्यातून भंगार गोळा करणारी कित्येक मुलं मी नेहमीच पाहत आली आहे. परंतु या मुलांच्या चेहऱ्यावरचे ते करूण भाव पुन्हा पुन्हा माझे चित्त वेधत होते. माझ्या लक्षात आलं…. त्या कचराकुंडीतून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फेकलेलं अन्न ते शोधत होते. कारण नंतर लगेचच त्यांच्यातील एका लहान मुलाने ती पिशवी एका पेपरवर उलट केली व स्वतःची क्षुधा सुद्धा भागवली. ते दृश्य माझ्या मनाला वेदना देऊन गेले.

काल-परवा एका नातेवाईकाच्या लग्नाला मी उमरगावला गेली होती पंचपक्वान्न,मिष्टान्न, खाण्यासाठी जवळपास साठ स्टॉल आणि चारशे पदार्थांची रेलचेल. श्रीमंतीच्या प्रदर्शनात आयोजकांनी कुठेही कमी ठेवलेली नव्हती. मी थोडं खाल्ले, अन्नाचा वास आणि कोलकात्याची ती विदारक आठवण, मला जेवण गेलं नाही. प्लेट ठेवायला एका ड्रम जवळ आली आणि माझं काळीज चिरले गेले. केवढं अन्न लोक वाया घालवत होते, ना कुणाला त्याची चिंता वाटत होती ना कुणाला तमा..! बेफिकिरीने काहीजण एकमेकांना आग्रह करत होते. मानापमानाच्या या खेळात, प्रतिष्ठेत जबरदस्तीने ताटात टाकलेले अन्न सरळ कचऱ्यात जात होतं. डोळ्यांच्या ओलावलेल्या कडांमधून राबराब शेतात राबणारा बळीराजा दिसला..! किती कष्टाने तो आपली क्षुधा तृप्त करण्यासाठी घाम गाळतो….आणि आम्ही??

जरा भूतकाळात शिरले मन माझे.भाकरी मागून जगणारी ती गावातली सुमन आठवली. गावभर फिरायची कुणी अर्धी, कुणी चतकोर दिली की पोटाला लागेल तेवढं खायची. उरलेल्या भाकरी उन्हात वाळवायची. खलबत्त्यात त्याचा काला बनवायची आणि लसणाच्या पाण्यासोबत खायची. पण एक तुकडा ही कधी फेकलेला तिने मी पाहिला नाही. कारण क्षुधा काय असते तिने दुष्काळात अनुभवलेलं ती आम्हाला नेहमी सांगायची. क्षुधा, भूक …. अन्नाची असो की ज्ञानाची भागवायला तर हवीच…! रस्त्यावर पडलेला पेपरचा एखादा तुकडाही तो वेडा नामा उचलायचा आणि वाचायचा. लोक म्हणायचे अति हुशार होता म्हणून जरा डोक्यावर परिणाम झालाय. पण माझ्या मनाने हे कधीच मान्य केले नाही. त्याची ती ज्ञानाची भूक तो भागवायचा.

“क्षुधा…. मग ती प्रेमाची असो की त्यागाची
ज्ञानाची असो की श्रद्धेची,
नात्याची असो की माणुसकीची .
मायेची असो की आपुलकीची..”

वेळोवेळी ती भागवली तर मन तृप्त होतेच ना ? तसं पाहता शिलेदारी पण आपण हेच काम करतो… ज्ञानक्षुधा भागवण्यासाठी काव्यामृत प्राशन करतो. आज याच भावनेने ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘क्षुधा तृप्ती’ हा विषय दिला आणि आपण सर्वांनी आपापल्या परीने आपली ज्ञानक्षुधा भागवण्याचा प्रयत्न केला. ‘क्षुधा तृप्ती’ वर लिहितांना कोणी वसंताच्या नवरंगी रंगाचं होणारं शिंपण तर कोणी सर्व जीवजंतू, प्राणीमात्रांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या.

काहींनी स्वार्थी वृत्तीमुळे न होणारी क्षुधा तृप्ती विषयी तर काहींनी आईच्या दुधाची महती गायिली. काहींनी क्षुधा तृप्तीसाठी समाधानाचा मंत्र जपण्याचा सल्ला दिला तर, काहींनी संकटांवर मात करून क्षुधा तृप्तीचा संकल्प केला.
आपण सर्वजण छान व्यक्त झालात. आपले मनापासून अभिनंदन आणि पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.

सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles