
शेतकरी व गरजुंना विविध साहित्याचे वितरण
गडचिरोली : जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने कोरोना काळात विविध उपक्रम राबविले जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन, चहा व बिस्कीट वितरण करण्यात येत आहे. तब्बल ४५ दिवसांपासून हा उपक्रम सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ जून ते ११ जून दरम्यान जिल्ह्यात ‘सेवा सप्ताह’ राबविण्याचे नियोजन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांनी केले आहे.
कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोणतीही बडेजावकी न करता वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. कोणतीही उधळपट्टी न करता ५ ते ११ जून दरम्यान विविध घटकांतील नागरिकांना मदत करण्यात येणार आहे. ५ जुनं रोजी शेतकऱ्यांना रासायनिक खताचे वाटप करण्यात येणार आहे. ६ जूनला महिला रुग्णालयात ब्लॉकेटचे वितरण, ७ जून रोजी गरजू कामगारांना अन्नधान्याची किट वितरण, ८ जूनला कोरोना सेंटरमध्ये व्हेपोरायझर वितरण, ९ जून रोजी मच्छरदाणी, १० ला सिलाई मशीन तर ११ जून रोजी छत्रीचे वितरण करण्यात येणार आहे.
या सर्व वितरण कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. कोरोना काळात जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन समितीने घोषीत केलेल्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळे ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी सदर उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांनी दिली आहे.