
महाविकास आघाडी आणि भाजप आघाडीविरोधात गडचिरोलीत तिसऱ्या आघाडीने ‘तिसरा डोळा उघडला आहे. जनविरोधी धोरणांच्या विरोधात लढा तीव्र करणार असल्याची घोषणा गडचिरोलीत आयोजित बैठकीत तिसऱ्या आघाडीने केली आहे.
केंद्रातील भाजप आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे धोरण हे सामान्य माणसांच्या मुळांवर उठलेली आहेत, जिल्ह्यात या जनविरोधी धोरणांच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार ‘तिसरी’ डावी लोकशाही आघाडीने केला आहे.
स्थानिक गांधी चौकातील विश्रामगृह येथे आज शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी रोहिदास राऊत, आघाडीचे निमंत्रक भाई रामदास जराते,काॅ.डाॅ.महेश कोपूलवार, राज बन्सोड,काॅ.अमोल मारकवार,प्रकाश दुधे,काॅ.देवराव चवळे,प्रतिक डांगे, हंसराज उंदिरवाडे, दिपक बोलीवार, भाई शामसुंदर उराडे,भाई अक्षय कोसनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यात नुकतीच तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आली. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा ‘तिसरी’ आघाडी निर्माण होण्याकरिता जिल्ह्यातील डावे, पुरोगामी व संविधानवादी राजकीय पक्षांनी जनविरोधी धोरणांच्या विरोधात एकत्र येवून लढा लढण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकी मध्ये जिल्ह्यातील ग्रामसभांच्या खदानविरोधी भुमिका, केंद्रीय कृषी विधेयके व राज्य सरकारने विधिमंडळाच्या पटलावर ठेवलेले दुरुस्ती कृषी विधेयके, पेट्रोल, डिझेल ची दरवाढ व वाढती महागाई, ओबीसी जनगणना व आरक्षण, पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण, वीज विधेयक २०२१ या विषयांवर चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका व व्यापक लढ्याचे नियोजनाकरीता लवकरच विस्तारित बैठक आयोजित करण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.