
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची माहिती
केंद्र सरकारच्या जुलमी धोरणाविरोधात अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांच्या नेतृत्वात दिनांक 5 आगस्टला दिल्ली येथे संसद घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने अनेक चुकीचे धोरण आखले आहेत. त्यामुळे जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढती बेरोजगारी चिंतेचा विषय बनला असतानादेखील सरकार याकडे लक्ष पुरविण्यास तयार नाही, हे दुर्दैव आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात महागाईने कळस गाठला आहे. सर्वसामान्य जनतेचे पुरते हाल सुरू आहेत. मात्र यांकडेही सरकारने लक्ष दिलेले नाही.
केंद्र सरकारने जासुसी कांड घडवून जनतेची विश्वासहर्ता गमावली आहे. या सर्व मुद्द्यावर केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे 5 ऑगस्टला दिल्ली येथे संसद घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे.