
गडचिरोली येथील वादग्रस्त प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलविरोधात पालकांनी बंड पुकारले आहे. शिवसेनादेखील या रणांगणात उतरली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळातील शालेय शुल्कात 50 टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी पालक व शिवसेनेने केली आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे रितसर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र जर यावर तोडगा निघाला नाही, तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा या पालकांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली घेतला आहे.
आज 2 ऑगस्टला गडचिरोलीत याबाबत पत्रकार परिषद घेत पालक व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांनी इंग्रजी माध्यम व त्यातही प्रामुख्याने गडचिरोली येथील वादग्रस्त प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या गैरकारभारविरुद्ध पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोरोना या जागतिक महामारीच्या तडाख्यात सर्वच क्षेत्र संकटात सापडले. शैक्षणिक क्षेत्र यापासून अलिप्त नव्हते. सलगपणे कित्येक दिवस शाळा बंद आहेत. अजूनही याबाबत सर्वसमावेशक निर्णय झालेले नाही. त्यामुळे सरकार स्तरावर विद्यार्थी, पालकांना दिलासा देण्याचे कार्य सुरू आहे. त्यात शुल्क मर्यादा, त्यातील तफावत, कपात अशा विविधांगी मुद्याचा समावेश आहे. असे असताना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळा मुजोरी करीत असून अतिरिक्त व अनावश्यक शुल्क वसूल करीत आहेत. यात गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल अग्रभागी असून ते विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत पालक व शिवसेना नेत्यांनी केला आहे.
शालेय व्यवस्थापन यंत्रणेकडून पालकांना संपूर्ण शाळाशुल्क भरा; अन्यथा तुमच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येईल, अशी धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत आहेत. प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलमध्ये दोन ऑगस्टपासून प्रथम आवर्त चाचणी घेण्यात येत आहे. मात्र शाळाशुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुरविल्या जाणार नाही, अशी आडमुठी भूमिका व्यवस्थापनाने घेतली आहे. यातून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
मुळात, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचे व्यवस्थापन मोठ्या प्रमाणात शासकीय निर्देशांना डावलून शाळा शुल्क घेत आहे. याबाबत पालकांनी वारंवार व्यवस्थपन मंडळाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. याबाबत मागे मोठे आंदोलनदेखील झाले होते. तरीही व्यवस्थापन सुधारण्यासाठी तयार नाही, यावर पालक व शिवसेनेने रोष व्यक्त केला आहे. कोरोनामुळे अनेकजण आर्थिक संकटात आहेत. अशास्थितीत एकमेकांना सहकार्य करण्याची भावना सरकारने घेतली आहे.
कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असून ते वेळोवेळी दिशानिर्देश देत शाळांना याबाबत आदेश देतात. मात्र तरीही प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचे व्यवस्थापन तुघलकी भूमिका घेत आहे. शासनाने याबाबत तातडीने चौकशी करून व्यवस्थापन मंडळीवर कारवाई करावी, शाळा शुल्कात 50 टक्के सूट द्यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत पालक व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांनी केली आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर प्रसंगी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.