Home कोकण सुरजागडमधील लोहदगड कंपनी आणि लोकप्रतिनिधीवर भिरकविणार, सुरजागडमध्ये आदिवासी नेत्यांचा एल्गार

सुरजागडमधील लोहदगड कंपनी आणि लोकप्रतिनिधीवर भिरकविणार, सुरजागडमध्ये आदिवासी नेत्यांचा एल्गार

982

आमच्या जन्मस्थळी आमचा प्रथम अधिकार आहे. येथील जल, जंगल, जमिन आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर कुणाचेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे सुरजागडच्या आमच्या पूज्यस्थळी जर कुणी लोहखनिज उत्खनन आणि त्याची वाहतूक केली, तर प्रसंगी सुरजागडचा तोच दगड संबधितांच्या डोक्यात हाणू, असा एल्गार सुरजागड ग्रामसभा इलाखा पट्टीतील आदिवासी बांधवांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्टला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील गोटूल भवनात सुरजागड ग्रामसभा इलाखा पट्टीच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरजागड लोहखनिज उत्खननावर आदिवासी नेते व कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला. सोबतच आमच्या जल, जंगल, जमिन व नैसर्गिक साधन संपत्तीवर भांडवलदारांना अतिक्रमण करू देणार नाही, अशी जाहीर गर्जना केली. यावरून आता लॉयड मेटल्स अ‍ँन्ड एनर्जी लिमिटेड व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपणीविरोधात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

९ आॅगस्टला सुरजागडच्या गोटूल भवनात सुरजागड ग्रामसभा इलाखा पट्टीच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिन कार्यक्रमाला आदिवासी नेते तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य सैनू गोटा, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी, जिल्हा परिषद सदस्य संजय चरडूके, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माकपा नेते अमोल मारकवार, कॉंग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, भामरागड पंचायत समितीच्या सभापती गोई कोडापे, एटापल्ली तालुका ग्रामसभेचे अध्यक्ष नंदू मट्टामी, पंचायत समितीच्या सदस्या शिला गोटा, सरपंच अरूणा सडमेक, कल्पना आलाम, सैनू हिचामी, सपना रामटेके, उपसरपंच राकेश कवडो प्रामुख्याने उपस्थित होते.
मार्गदर्शनात जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा यांनी सांगितले की, सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या रूढी, परंपरा, कला, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उद्बोधनाचे केंद्र आहे. हे आदिवासींचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे याठिकाणावर कुणाकडून अतिक्रमण होणे हे निषेधार्ह आहे. आदिवासींच्या हक्काच्या ठिकाणी अशाप्रकारे अतिक्रमण करून उत्खनन करणे हे आमच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रकार आहे. याठिकाणी स्थानिक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या माध्यमातून आम्हाला रोजगार मिळत आहे. मात्र आता भांडवलदार कंपण्यांकडून याठिकाणी लोहखनिजाचे उत्खनन व वाहतूक सुरू करण्यात आल्याने आदिवासींच्या रोजगार व एकूणच त्यांच्या सर्वांगिण विकासावर परिणाम पडण्याची भीती सैनू गोटा यांनी व्यक्त केली. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.
सुरजागड पहाडावरील लोहखनिजाचे उत्खनन तात्काळ थांबविण्यात यावे आणि येथील वनसंपदा, नैसर्गिक साधनसंपत्ती व जल-जंगल-जमिनीचे संवर्धन करावे, यासाठी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून निवेदन सादर केले होते. मात्र याबाबत अजूनही कार्यवाही झाली नाही, यावर या कार्यक्रमात रोष व्यक्त करण्यात आला. सोबतच जर हे काम थांबविण्यात आले नाही, तर प्रसंगी सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाच्या ठिकाणी विराट मोर्चा काढून तिथलाच दगड उचलून संबधितांच्या डोक्यात हाणू, अशी गर्जना यावेळी करण्यात आली. त्यामुळे लॉयड मेटल्स व एनर्जी लिमिटेड आणि त्रिवेणी अर्थमूव्हर्स या कंपण्यांच्या भविष्यातील वाटचालीत अडचणी येण्याची शक्यता आहे.

मावा नाटे-मावा सरकार…..

आमची संस्कृती खूप प्राचिन असून निसर्गपूजक आहे. त्यामुळे आमच्या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यात आदिवासी समाज सक्षम आहे. सरकारने आमच्या विकासाकडे लक्ष द्यावे. आमच्या साधनसंपत्तीवर भांडवलदार कंपण्यांना डल्ला टाकू देवू नये. त्यावर फक्त आमचा अधिकार आहे, अशी भावना व्यक्त करीत कार्यक्रमात नागरिकांनी ‘मावा नाटे-मावा सरकार’ अशी घोषणा दिली.

लोकप्रतिनिधींवर रोष, राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता

सुरजागडच्या मुद्द्यावर अहेरी उपविभागातील स्थानिक आणि गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वारंवार भूमिका बदलल्या आहेत, हे उघडपणे आत्तापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे आता सुरजागड भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त करण्याची भूमिका घेतली आहे. यातूनच जिल्ह्यातील व प्रामुख्याने अहेरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आणि गणिते बिघडण्याची शक्यता आहे. याची स्पष्ट झलक यापूर्वीच एका निवेदनातून समोर आली होती. सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समितीने जुलै महिन्यात गडचिरोलीच्या जिल्हाधिकाºयांमार्फत महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर करून सुरजागडमधील लोहखनिज उत्खननाचे काम बंद करावे, अशी मागणी केली होती. त्यात त्यांनी स्थानिक आमदारांवर रोषदेखील व्यक्त केला होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने याबाबत आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणीही केली होती. मात्र आत्तापर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या भूमिका विसंगतीदर्शक आणि वेळोवेळी बदललेल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक राजकीय पक्ष व प्रामुख्याने लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे. यातूनच अहेरी उपविभागात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.