ट्रॅव्हिस हेड चा गोलंदाजांना हेडेक’; डॅा अनिल पावशेकर

‘ट्रॅव्हिस हेड चा गोलंदाजांना हेडेक’; डॅा अनिल पावशेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_खेल खेल मे…._

टाटा आयपीएल २०२४ चे अर्ध्यापेक्षा जास्त सामने आटोपले असून यंदाही फलंदाजांचा दबदबा कायम राहिलेला आहे. दोनशे धावा आता विजयाची हमी राहिलेली नसून ज्याप्रकारे फलंदाज गोलंदाजांवर तुटून पडत आहेत ते पाहता अब की बार तिनसौ पार होण्याची चिन्हे दिसत आहेत. मोदी की गॅरंटी प्रमाणेच ट्रॅव्हिस हेड, जॅाश बटलर, अभिषेक शर्मा, ऋतूराज गायकवाड, मार्कस स्टोईनीस आणि इतरही फलंदाज आपापल्या संघांना विजयाची गॅरंटी देत आहेत. त्यातही सनराईझर्स हैद्राबादचा ट्रॅव्हिस हेडने घणाघाती फलंदाजी करत तमाम विरोधी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले आहे.

आयपीएलच्या या मोसमात शतकांचा सुळसुळाट झाला असला तरी खरी मैफील ट्रॅव्हिस हेड लुटत आहे. जणुकाही चंगेझ खानचा फलंदाजी अवतार असल्या सारख्या तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या बिनबोभाट कत्तली करत सुटला आहे. पहिला पॅावर प्ले म्हणजे त्याच्यासाठी खुले मैदान असते. भरीस भर म्हणजे कर्णधार पॅट कमिन्सने त्याला लायसन्स टू किल दिल्याने बिच्चारे गोलंदाज त्याच्या तडाख्यातून सुटणे केवळ अशक्य असते. खरी गंमत म्हणजे हेड चा सहकारी फलंदाज अभिषेक शर्मा त्यामानाने नवोदीत परंतु हेड चा सहवास लाभताच या दोघांची बडे मियां छोटे मियांची जोडी सामना हातोहात गिळंक्रुत करतात.

वास्तविकतः पॅावर प्ले मध्ये क्षेत्ररक्षकांच्या मर्यादेमुळे गोलंदाजांचा कोणी वाली उरला नाही. तरीपण एखाद्या फलंदाजाचा व्यवस्थित ग्रुहपाठ केला तर त्याला आवर घालता येऊ शकते. वेगवान गोलंदाज हे हेडचे आवडते खाद्य. त्यातही शॅार्ट पीच, बॅक अॅाफ लेंथ चेंडू टाकले की त्याच्यातल त्रस्त समंध उफाळून येतो. मग तो गोलंदाजांना वेड्यासारखा मारत सुटतो. पुल, कट चा वापर करत तो चोहोदिशांना सुसाट निघतो. एरवी संथ वाहणारे विरोधी गोलंदाज हेड च्या हिप्नॅाटीझमने वेगात चेंडू टाकतात आणि मार खातात. भलेही हेड ला अनेकदा वेगवान गोलंदादांनीच बाद केले आहे पण चेंज अॅाफ पेस, स्लोअर वन आदी आयुधांसोबतच योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षक ठेवले तरच हेड काबूत राहतो. अन्यथा गोलंदाजांच्या नशिबी उठता लात बसता बुक्की असते.

हेड च्या फलंदाजी बाबत बोलायचे झाले तर त्यात अस्सल कांगारू अॅप्रोच आढळतो. स्पर्धा कोणतीही असो, विरोधी गोलंदाज कुठलाही असो कोणत्याही स्थितीत वैयक्तिक स्कोअर पेक्षा संघहितास प्राधान्य देत गोलंदाजी फोडून काढतात. यामुळे संघाला चांगला प्रारंभ तर मिळतोच शिवाय उर्वरीत फलंदाजांचा आणि संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. याच हेड ने आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये बुमराह, शमी, सिराज वर प्रतिहल्ला करत आपल्या हातून विश्वचषक हिसकला होता. जिथे रोहीत वगळता आपले नामचीन फलंदाज डिफेन्स मिनिस्टर झाले होते, तिथे हेडची साहसी फलंदाजी त्याच्या संघाला जगज्जेतेपद देऊन गेली. साहसे श्री प्रतिवसते म्हणतात ते याचसाठी.

आयसीसी कसोटी विश्वचषक फायनलमध्ये हाच हेड टिम इंडियाला नडला होता. आयसीसीच्या दोन्ही फायनलला (एकदिवसीय आणि कसोटी अजिंक्यपद) शतक ठोकणारा ट्रॅव्हिस हेड हा एकमेव फलंदाज आहे. सोबतच दोन्ही फायनलला प्लेअर अॅाफ दी मॅच बहुमान पटकवणारा एकटाच खेळाडू आहे. सध्याच्या आयपीएल हंगामात सहा सामन्यात एका दणदणीत शतकासह त्याने सव्वा तिनशे धावा ठोकल्या आहे, ते सुद्धा दोनशेच्या वर स्ट्राईकने! अर्धशतक अथवा शतक जवळ असतांना फलंदाजांत हमखास आढळणारी बद्धकोष्ठतेची लक्षणं त्याच्यात अजिबात आढळत नाही.

थोडक्यात काय तर आधीच दारिद्र्य रेषेखाली असलेली गोलंदाजांची जमात आयपीएलच्या काही बॅटर फ्रेंडली नियमाने आणखीनच निपचीत पडली आहे. पॅावर प्ले, नो बॅालवर फ्री हिट, इम्पॅक्ट प्लेअर, स्लो ओव्हर रेट असेल तर शेवटी आऊटफिल्डच्या क्षेत्ररक्षणात कपात हे नियम गोलंदाजांच्या मुळावर उठले आहेत. त्यातच ट्रॅव्हिस हेड सारखी आक्रमक प्रजाती जणुकाही गोलंदाजांचा समूळ उच्चाटनास कटीबद्ध असल्यासारखे त्यांच्यावर तुटून पडतात. सध्यातरी हेडने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा हेडेक वाढवत त्यांना जेरीस आणल्याचे दिसत आहे. ट्रॅव्हिस हेडच्या मिशांचा भार गोलंदाजांना झेपत नसल्याचे चित्र मैदानावर दिसून येत आहे.

डॉ. अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles