
गडचिरोली जिल्ह्याच्या शिवसेनेत वारंवार दुफळी निर्माण झाल्याचे आतापर्यंत वारंवार निदर्शनास आले आहे. आतादेखील ही परिस्थिती तशीच कायम असून पूर्वीपेक्षा आता ती एकदमच अटीतटीवर आल्याचे निदर्शनास आले आहे. याला कारण ठरले आहे, ते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा गडचिरोली दौरा…
मंत्री उदय सामंत हे शनिवार, दोन तारखेला गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठामार्फत आयोजित कार्यक्रमासाठी गडचिरोलीत येत आहेत. त्यावरून गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या समाज माध्यमावर अतिउत्साहित असल्याचे दिसून आले आहे. यातूनच आरमोरी आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी यांच्यात समन्वय नसून परस्पर विरोधाभासी भूमिका असल्याचे उघड झाले.
आज शुक्रवारी शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया ग्रुपवर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम यांनी एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मंत्री महोदय उदय सामंत हे गडचिरोलीत शनिवारी येत आहेत. त्यांच्यासोबत संपर्कप्रमुख किशोर पोद्दार हे राहणार आहेत. दुपारी एक वाजता सर्किट हाउसमध्ये शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक ठेवली आहे. त्यावेळी ज्यांना मंत्री महोदयांना भेटायचे; निवेदन सादर करायचे वा प्रत्यक्षात चर्चा करायची असेल, त्यांनी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, भारत जोशी, छाया कुंभारे, अविनाश गेडाम, शेखर मने, चंदू बेहरे, वेणू ढवगाये, हेमलता वाघाडे यांना कळवावे, असे म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून लगेचच अहेरी विधानसभा क्षेत्रातील जिल्हाप्रमुख रियाज शेख समर्थक एका कार्यकर्त्यांनी उलट पोस्ट टाकली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मंत्री महोदयांना भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी वा निवेदन सादर करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थी व्यक्तीची गरज नाही. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या स्तरावर, जसं शक्य होईल त्याप्रमाणे व्यक्तिगतपणे मंत्री महोदयांना भेटावे, असे जाहीर आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले आहे. यावरून दोन क्षेत्राच्या दोन जिल्हाप्रमुखात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नसून अंतर्गत दुफळी माजली असल्याचे निदर्शनास येत आहे.
विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पक्षातील अंतर्गत कलहाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीपण अशीच काही गंभीर प्रकरण सोशल मीडियावर उघडपणे उजेडात आली. दारूविक्री आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिवसेनेत प्रवेश देणे, त्यांना पद बहाल करणे, पक्षाच्या नावावर नको त्या उचापती करणे, निष्ठावंत-कर्मठ पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या आणि अप्रिय लोकांना अधिकार बहाल करणे यावरून शिवसेना जिल्हा गडचिरोलीत वारंवार अंतर्गत कुरबुरी निदर्शनास आल्या.
पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावरून तर अनेकानेक किस्से स्वतः सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उघडपणे बोलताना दिसतात. त्यात आता मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना पक्षातील अंतर्गत कलह पेट घेण्याची शक्यता आहे. याचा संपूर्ण अहवाल मंत्री महोदयांना आजच पोहोचणार आहे, हेही येथे उल्लेखनीय आहे.