
आगामी गडचिरोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने यात भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. जनतेमधून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना पक्षाच्याचं सहकारी नगरसेवकांच्या तक्रारीवरून नगरविकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपमध्ये मोठा दगाफटका होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गडचिरोली नगर पालिकेच्या अध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांना नगरविकास मंत्रालयाने अपात्र घोषित केल्यानंतर याबाबत तीव्र हालचाली सुरू आहेत. याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर काँग्रेस आणि भाजप पक्षातील काही असंतुष्ट मंडळींनी ‘मराठी इ-न्यूज नेटवर्क’ कडे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात गडचिरोलीत मोठी राजकीय उलथापालथ घडण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरातील नगरपालिका निवडणूक कायम आणि दर निवडणुकीत सर्वच पक्षासाठी आव्हानात्मक राहिली आहे. कोणत्याही पक्षाचे हे राजकीय केंद्रबिंदुचे ठिकाण असल्याने सर्वच राजकीय पक्ष स्थानिक नगर पालिकेवर आपापल्या सत्तेच्या अभिलाषा बाळगून राहतात. त्यामुळे आगामी निवडणूकदेखील त्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची राहणार आहे.
मागील नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून योगिता प्रमोद पिपरे या निवडून आल्या. शिवाय भाजपचे 21, काँग्रेसचे 1, रासपचे 1 आणि अपक्ष असे 2 उमेदवार गडचिरोली नगर पालिकेत सदस्य म्हणून दाखल झाले. त्यानंतर स्वीकृत सदस्य म्हणून बहुमताच्या आधारावर भाजपच्या तिघांची वर्णी लागली. त्यात भाजपचे जेष्ठ नेते आणि नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे पती प्रमोद पिपरे यांचा समावेश होता.
सुरुवातीला भाजप बहुमतातील सत्ताधारी नगर पालिकेचा कारभार सुरळीत सुरू झाला. मात्र त्यानंतर अचानकपणे सत्ताधारी मंडळीत वादाची ठिणगी पेटली. ही ठिणगी आतापर्यंतच्या कालावधीत वणवा झाला आणि शेवटी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्यात आले. यात सहकारी, स्वपक्षीय सदस्यांनी पुढाकार घेतला होता. आता या मुद्द्यावर भाजपमध्ये मोठी धुसफूस सुरू झाली आहे. भाजपचे गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या अपात्र प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘लक्ष्य’ केले आहे. तर खासदार अशोक नेते आणि भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष किंवा अन्य जबाबदार पदाधिकारी मंडळींनी याबाबत चुप्पी साधली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जेमतेम तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गडचिरोली नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला अनंत अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अपात्र घोषित करण्यात आल्याने आणि पक्षाचे परिपूर्ण सहकार्य न मिळाल्याने पिपरे दांपत्य आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत. दुसरीकडे ज्यांनी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्याविरोधात बंड पुकारले होते, ते भाजपचे नगरसेवक या निर्णयामुळे समाधानी आहेत. मात्र यात पक्षात दुफळी निर्माण झाली असून अंतर्गत कलह सुरू झाला आहे. यातूनच आगामी निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ घडू शकते, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. याबाबत पक्षातील जबाबदार नेत्यांनी ‘मराठी इ-न्यूज नेटवर्क’ शी बोलताना याचे स्पष्ट संकेत देखील दिले आहेत.