
गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्तमान युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नियुक्तीने युवा वर्गात, ओबीसी घटकात व एकूणच काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. सोबतच काँग्रेसला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ४ उपाध्यक्ष, १६ सरचिटणीस, १ प्रवक्ता, १७ सचिव,२ प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि ९ जिल्ह्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली. या यादीत महेंद्र ब्राम्हणवाडे यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे हे ३५ वर्षे वयाचे असून, यापूर्वी त्यांनी ३ वर्षे एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष व युवक काँग्रेसचे ३ वर्षे लोकसभा अध्यक्षपद सांभाळले आहे. मागील ३ वर्षांपासून ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून महेंद्र ब्राम्हणवाडे यांची सर्वत्र ओळख आहे. ओबीसींचा युवा नेता म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वदूर परिचित झाले आहे. ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी मोर्चे, मेळावे आदींच्या माध्यमातून सतत आवाज उठविला आहे. शिवाय यंदा कोरोना संसर्गाच्या काळात सतत ६० दिवस रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान, रक्तपुरवठा आणि रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचे मोठे कार्य केले आहे. एकूणच काँग्रेसला प्रथमच युवा, सतत कार्यरत आणि जनसंपर्क ठेवणारा जिल्हाध्यक्ष मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.नामदेव किरसान यांनाही प्रदेश सरचिटणीस बनविण्यात आले असून, त्यांच्या जागेवर दिलीप बन्सोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.