
गडचिरोली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी येत्या 9 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेला आज 3 डिसेंबरपासून सुरुवात झाली. नामांकन दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी दोन नगरसेविकांनी प्रत्येकी दोन असे एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजपच्या नगरसेविका अल्का पोहनकर व पूजा बोबाटे या दोघींचा समावेश आहे. आजच या सर्व नामांकनाची छाननी होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातील पालिका सदस्य महिला नवी नगराध्यक्ष म्हणून निवडली जाणार आहे. त्यामुळे आता पोहनकर की बोबाटे नव्या नगराध्यक्ष होतील, याबाबत उत्सुकता आहे.
थेट जनतेमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या योगिता प्रमोद पिपरे यांना नगरविकास मंत्रालयाने नगराध्यक्ष पदासाठी अपात्र ठरविल्याने आता ही निवडणूक घेण्यात येत आहे. 18 डिसेंबर 2016 ला गडचिरोली नगराध्यक्ष व अन्य सदस्यपदासाठी निवडणूक झाली होती. यात भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठा विजय मिळवून पालिकेची सत्ता एकहाती प्राप्त केली होती. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून योगिता प्रमोद पिपरे थेट जनतेमधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 18 जानेवारी 2017 ला पालिकेची विशेष सभा पार पडली होती. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ 17 जानेवारी 2022 ला संपणार आहे. यादरम्यान नगराध्यक्ष योगिता पिपरे व काही नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला आणि नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीवरून नगरविकास मंत्रालयाकडून नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकारी मिना यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज 3 डिसेंबरला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानुसार पूजा बोबाटे व अल्का पोहनकर यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
आजच दुपारी 2 ते सायंकाळी 5 या कालावधीत प्राप्त नामांकन अर्जांची छाननी करण्यात येईल. 9 डिसेंबरला पालिकेच्या सभागृहात दुपारी 12 वाजता विशेष सभा घेऊन नामाप्र महिला सदस्यांमधून नवी नगराध्यक्ष निवडली जाणार आहे.