वाढदिवसाच्या निमित्ताने : सर्वसामान्य जनतेसाठी असामान्य भाईगिरी करणारे नेतृत्व म्हणजे रामदास जराते

गडचिरोली तालुक्यातील पुलखल सारख्या लहानशा गावात भाईंचा जन्म झाला. गावातील अत्यंत मागास भटक्या ढिवर जमातीतल्या ‘जराते’ परिवारात जन्मलेल्या भाईंचे प्राथमिक शिक्षण पुलखल येथेच झाले. लहानपणापासूनच पाण्याशी ‘दोस्ती’ असल्यामुळे हायस्कूलचे शिक्षण घेत असताना जिल्हा काॅम्पलेक्स हायस्कूल चे क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतांना ‘जलतरणातील’ प्राविण्य मिळवले. गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण प्रशिक्षक डॉ.जयप्रकाश दुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ साली रामदास भाईंनी थेट अरबी समुद्रातील सागरी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यानंतर ते एलिफंटा केव्हज् ते गेट वे ऑफ इंडिया १९ किलोमीटर, धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया ३५ किलोमीटर या राष्ट्रीय विक्रम नोंदलेल्या साहसी सागरी अभियानातही सहभागी झाले होते. नदी आणि तलावात सराव करुन जिल्ह्यातील पहिला सागरी जलतरणपटू होण्याचा मान मिळविणाऱ्या रामदास भाईंनी १९९९ साली आपल्या प्रशिक्षकांसह मंत्रालयात क्रीडा विभागाच्या सचिवांची आणि तत्कालीन पालकमंत्र्यांची भेट घेऊन गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात जलतरण तलाव मंजूर करावे अशी विनंती केली होती. त्यानंतर क्रीडा संकुलाच्या निधीतून चंद्रपूर नंतर गडचिरोली येथील काॅम्प्लेक्स जलतरण तलावाचे शासनाने बांधकाम केले हे विशेष !



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गडचिरोली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच त्यांचा विद्यार्थी चळवळीशी आणि पत्रकारीतेशीही संबंध आला. काही काळ तरुण भारत मध्ये बातमीदार म्हणून काम केले. लोकमतमध्ये ‘क्रीडा प्रतिनिधी’ ची त्यांनी जबाबदारी पार पाडली. २००३ मध्ये ते एका जेल भरो आंदोलनात सहभागी झाले आणि तेव्हापासून रस्त्यावरच्या आंदोलनाकडे वळले. युवा अनुभव शिक्षा केंद्र, धडपड युवा चळवळ आणि गैरनोकरदार वर्ग संकल्पना या चळवळींतही सहभागी झाले.

समाजकार्याचे शिक्षण घेतानाच ते पुर्णवेळ चळवळींशी जूळून महाराष्ट्र ग्रामविकास जनआंदोलनाची त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही स्थापना केली होती. नंतर महाविद्यालयाच्या ‘कारभारा’ बद्दल जेव्हा मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडाच्या पाल्यावर बसून आंदोलन केले, त्यावेळीही त्या आंदोलनात पुर्णवेळ सहभागी होवून भाईंनी मोठे नियोजन करून आंदोलन यशस्वी केले होते.

तरुणांनी राजकारणापासून दूर जावून काहीच फरक पडणार नाही उलट तरुणांनी राजकारणात आले तरच काही बदल अपेक्षित आहेत,असा रामदास भाईंचा ठाम मत असल्याने २००७ मध्ये मुडझा गुरवळा गणात पायी फिरून स्वतः पंचायत समिती निवडणूक लढविली होती. त्यानंतर गरिबांनी निवडणुकीत का उभे राहू नये? असा प्रश्न करून २००९ साली आरमोरी विधान सभा क्षेत्रात ‘जनतेचा उमेदवार’ आपला सहकारी रोहिदास कुमरे यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरविले होते. २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पत्नी जयश्री वेळदा आणि उर्मिला पदा यांनाही राजकीय क्षेत्रात सक्रिय केले. २०१७ मध्ये भाजप आणि संघ विरोधी आवाज बुलंद करत ग्रामसभांचे प्रतिनिधी उभे करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. आदिवासी मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना पंधरा दिवसांसाठी जेलात जावे लागल्याने त्यांची ‘सीट’ गेली, मात्र दोन जिल्हा परिषद आणि ४ पंचायत समिती सदस्य त्यावेळी जनतेचे उमेदवार म्हणून निवडून आले.

विद्यार्थी, युवक चळवळींशी जोडल्या जावून मार्क्सच्या तत्वज्ञानाशी जवळीकता वाढली आणि रामदास भाई ‘मार्क्सवादी’ कधी झाला हे लक्षातही आले नाही. २००६ पासून पेंढरी परिसरातील ग्रामसभांशी जुळून शाश्वत विकासासाठी भाई सक्रिय झाले. पेसा, वनाधिकाराची चळवळ व्यापक व्हावी यासाठी झटणाऱ्या पैकी भाई सुध्दा एक सक्रिय कार्यकर्ते. यातून लाखो एकर जंगल नष्ट करु पाहणाऱ्या जिल्हाभरातील लोह खाणींच्या विरोधात पत्नी जयश्री सह पुर्णवेळ सक्रिय झाले. मार्क्स च्या क्रांतीचा सिध्दांत आणि शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या प्रत्यक्ष कृती कार्याची प्रेरणा घेऊन जल, जंगल, जमीन आणि संसाधनाच्या मालकी हक्कांच्या लढ्यात भाई भांडवलदारांच्या विरोधात उभे राहिले ते शड्डू ठोकुणच! मग रामदास भाई सशस्त्र हिंसेच्या विरोधात लढले नाही तर नवलच! शस्त्रांचा जोरावर केली जाणारी हिंसा तो सरकारी असो वा खाजगी त्याविरोधात संविधानिक पध्दतीने लढायलाच हवे हा भाईंचा आग्रह आहे.

परिस्थितीशी झगळतांना उभा राहिलेला उद्याचा नेतृत्व म्हणून आम्ही बघत आलो असतांनाच रामदास भाईंनी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बाबटा खांद्यावर घेतला आणि राजकीय पर्याय स्विकारला मात्र लढायचे मुद्दे आणि पध्दत आजही तीच आहे. २००९ साली गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यातील १५० पेक्षा अधिक प्राथमीक शाळा अनेक महिने बंद असल्याने आदिवासींचे भविष्य धोक्यात आले असून प्रशासनाने तातडीने शाळा सुरू कराव्यात यासाठी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला.मात्र काहीच फरक पडत नाही हे बघून रामदास भाईंच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ‘आनंद भरकाळे’ यांना त्यांच्यात कक्षात जावून काळे फासले होते. जिल्ह्यातील लोह खाणी विरोधात लढा लढतांना आजही रामदास भाईंनी थेट मुंबईत जावून विधान भवनाच्या गेटसमोर आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधणे हे त्यांच्यातील लढावू कार्यकर्ता रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज आहे हेच दाखवून देतो.

गडचिरोली जिल्ह्यातील जंगलावर आधारित उद्योग उभे राहिले पाहिजे ही रामदास भाईंची इच्छा. त्यासाठी जिल्ह्यात एफसेझ म्हणजे फाॅरेस्ट स्पेशल इकाॅनामिक झोन सरकारने निर्माण करावा ही दहा बारा वर्षांपूर्वी मागणी करणारे ते पहिले कार्यकर्ते होत. दुर्दैवाने जिल्ह्यातील स्थानिकांचा पारंपारिक रोजगार नष्ट करुन संसाधनांची खुली लुट करण्यात येत आहे. याविरोधात भाई मात्र डोक्यात मार्क्स आणि कृतीत शिव, शाहू, फुले, आंबेडकर घेऊन उभा राहिला आहे. अंगावर पत्नी आणि आपणही कित्येक केसेस घेऊन लढतो आहे, संघर्ष पुढे रेटतो आहे. भाईंनी ही लढाई विधिमंडळाच्या दारावर नेली, आता संसदेत पोहचवण्यासाठी आटापिटा करतो आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे काम करतांना रामदास भाईंनी निवडणुकीच्या राजकारणात गडचिरोलीत विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात आव्हान उभे केले होते. येणाऱ्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ही धार आणखी तीक्ष्ण होईलच यात शंका नाही.

आदिवासींच्या हक्कांसाठी, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगारांसाठी लढणारा विदर्भच नव्हे तर येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात रामदास भाई आपला ठसा उमटवेल या अपेक्षेसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… क्रांतिकारी लाल सलाम!

– भाई देवेंद्र चिमनकर,
शेतकरी कामगार पक्ष,
गडचिरोली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles