
उद्योगविरहित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहप्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. त्यानुसार प्रकल्पस्थळी स्थानिक काही बेरोजगार युवक-युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. रविवारी हा कार्यक्रम पार पडला.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागडमध्ये लोहखनिज उत्खनन करणाऱ्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्यावतीने परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना विविध स्वरूपाचे प्रशिक्षण आणि त्यांना रोजगार देण्यात येत आहे. आतापर्यंत हजारांवर बेरोजगार युवक-युवतींना या कामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे. याचाच एक भाग म्हणून परिसरातील 9 युवतींना वाल्वो ऑपरेटिंग, एलएमव्ही ऑपरेटिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना परवाना मिळवून देण्यात आला. या सर्व बेरोजगार युवतींना रविवारी कंपनीच्यावतीने नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड, कंपनीचे संचालक व्यंकटेश्वरण, भास्कर, वरिष्ठ व्यवस्थापक साईकुमार, नंदकुमार डोंगरे, शेट्टी प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरजागड लोहप्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.