
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणार असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस (Congress) राहणार की जाणार? यासाठी उद्या दिल्लीत फैसला होणार आहे अशी माहिती हाती आली आहे.
काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे. काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केली. काँग्रेसचे नगरसेवक फोडले. आमदार निधीमध्ये भेदभाव केला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेत्यांची नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच महाविकास आघडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर उद्या दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलावण्यात आलेलं नाही, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला खरंच धुसफूस आहे की काय, असं चित्र निर्माण झालं आहे. कारण शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतंच एक मोठं विधान केलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम पाळला जात नाही. निधी वाटपाबाबत ठरलेला फॉर्म्युला वापरला जात नाही. आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसबाबत ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खरंच बिघाडी आहे की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.