
नितीनजींच्या हस्ते साकोली – लाखनी उड्डानपुलाचे लोकार्पण
*उड्डानपुलाचे शामरावबापू कापगते असे नामकरण*
✍️संदीप नंदनवार
भंडारा : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यातल्या साकोली – लाखनी येथील उड्डानपुलाचे लोकार्पण करण्यात आले.
साकोली व लाखनी उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . साकोली येथील होमगार्ड ग्राऊंडवर हा कार्यक्रम पार पडला . साकोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर 2.94 किमी लांबीचा उड्डाणपूल 270 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे , तर लाखनी येथे 3.50 किमी लांबीचा 312 कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्यात आला . काही दिवसांपासून या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा होती . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनील मेंढे , माजी पालकमंत्री आ.परिणय फुके , गजानन डोंगरवार , माजी आमदार बाळा काशिवार , माजी आमदार डॉ . हेमकृष्ण कापगते , भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरहेपुंजे आदी उपस्थित होते.
*जिल्हावासियांसाठी योजनांचा पिटारा*
गडकरींनी आज भंडारा जिल्हावासियांसाठी योजनांचा पिटारा खोलला . ते म्हणाले , गोसेखुर्द धरणाच्या बेटावर फाईव्ह स्टार हॉटेल तयार करण्यात येणार आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्योग सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे . तणसापासून चार लाख लिटर इथेनॉल तयार करणारे उद्योग सुरू करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले . यावेळी गडकरी यांनी लाखनी आणि साकोली येथील उड्डाणपुल हे बांधकामाच्या उत्कृष्ट नमुना आहे. देशात साकोली आणि लाखनी या उड्डाणपुलाला स्टेट ऑफ आर्ट म्हणून ओळखले जाणार असल्याचे सांगितले. तसेच या दोन पुलांना उत्कृष्ट कारागिरीचा नमुना म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा केली.
*उड्डाणपुलाला श्यामरावबापू कापगते यांचे नाव*
साकोलीच्या उड्डाणपुलाला श्यामरावबापू कापगते यांचे नाव देत साकोलीचा उड्डाणपूल साकोलीकरांना समर्पित केला. जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले साकोलीचे स्व. शामरावबापू कापगते यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात आले श्यामरावबापू कापगते हे माजी आमदार डॉ . हेमकृष्ण कापगते यांचे वडील होत. तांदूळ निर्यात करण्यासाठी लॉजिस्टिक पार्क तयार करणार असल्याचे यावेळी गडकरी म्हणाले . तसेच सीएनजीवर ट्रॅक्टर चालवणार असल्याचेही ते बोलले . भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तणस होते. या तणसावर प्रक्रिया करून इथेनॉल तयार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले . त्यामुळे जिल्ह्यात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
प्रदीर्घ काळापासून भंडाऱ्यातील नागरिक प्रतीक्षेत असलेल्या या दोन्ही उड्डाणपुलांच्या निर्माणामुळे साकोली व लाखनी या दोन्ही शहरांची रहदारीची समस्या दूर होईल. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल ट्रॅफिक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वर ही दोन्ही शहरे असल्याने ट्रॅफिक जाम, अपघात, प्रदूषण अशा समस्यांना तोंड देणाऱ्या येथील जनतेला या पुलांमुळे दिलासा मिळेल. परिसरातील जलसंवर्धनाचे मह्त्त्व लक्षात घेता या दोन्ही पुलांवरील पावसाचे पाणी आसपासच्या परिसरात मुरेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.
पुलांच्या खाली व वर अशा दोन्ही ठिकाणी झाडे लावण्यात आली असून इतर सुशोभीकरणही करण्यात आले आहे. ऍक्सेस कंट्रोल गुणवत्तेचे हे उड्डाणपुल तयार करण्यात आले असून यामुळे आता शहरांची बायपासची गरजही पूर्ण झाली आहे. यामुळे आता बायपाससाठी अतिरिक्त भूमी अधिग्रहनाची गरज नसून तेवढी बचत होऊ शकेल.