
औरंगाबादेत उद्धव ठाकरेंची नुसती ‘टोमणेबाजी’; देवेंद्र फडणवीस
_सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून रिंगणात_
मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले असून, निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवार) सायंकाळी औरंगाबादेत जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. खोटे बोलणे हे आमचे हिंदुत्व नाही, असे ते म्हणाले. हिंदुत्व हाच आमचा श्वास असल्याचे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर विरोधक जोरदार टीका करत आहेत. मनसे आणि भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला. भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, “बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही. पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही. त्यांनी दुसऱ्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे. म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…! माझे पुन्हा सवाल आहेत. शेतकऱ्यांना मदत केव्हा करणार?, पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?. असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना… काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे ! नुसतीच टोमणेबाजी करून औरंगाबादकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे.
*सदाभाऊ अपक्ष लढणार*
भाजपकडून विधानपरिषदेसाठी आज पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. तर रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांना अपक्ष उमेदवार म्हणून भाजपचा पाठिंबा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपने आज खोत यांना मुंबईला बोलावल्यापासूनच राजकीय चर्चांना ऊत आला होता. आता याला पूर्णविराम मिळाला आहे. आमचे ५ उमेदवार आणि सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून पाठिंबा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
औरंगाबादेत “ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. यावेळी मनसेचे अमेय खोपकर यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “चंदू खैरे सभेआधी पैसे वाटताना… चंदू खैरेंचा ‘आक्रोश’ – सभेसाठी या रे”, असे ट्वीट खोपकर यांनी पुरावा देत केले आहे. याबद्दलही कालपासून नानाविविध चर्चेला उधाण आले आहे.