बीट गस्तीवर असताना वनमजूरावर रानडुकराचा हल्ला
_प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल_
पालांदूर : कर्तव्यावर असताना अचानक पणे वन्यप्राणी रानटी डुकराने हल्ला करीत वनमजूराला गंभीर जखमी केले. किटाडी सहवनक्षेत्र अंतर्गत कक्ष क्रमांक २१३ येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान ही घटना घडली. भिवा दयाराम दिघोरे वय 55 वर्ष रा.किटाडी असे जखमी वन मजुराचे नाव आहे. तत्काळ सहकारी वनकर्मचारी यांनी ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे हलविले. प्राथमिक उपचारानंतर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे , क्षेत्र सहाय्यक हमीद शेख, क्षेत्र सहायक विनोद पंचभाई यांनी घटना स्थळाला भेट देऊन जखमी मजुराची आस्थेने विचारपूस केली. आरोग्य सेवेकरिता तत्काळ सेवा उपलब्ध करून वन मजूराला मानसिक आधार दिला.
किटाळी जंगलात कक्ष क्रमांक २१३ मध्ये आग लागल्याचे दिसून आले. तत्काळ सर्व कर्मचारी यांनी आग विजविण्यास सुरुवात केली. याप्रसंगी रानटी डुकराने बेभानपणे वनमजूराला धडक दिली. या धडकेत त्याच्या खांद्याला जबर मार लागला. त्यांच्या सोबत बीट रक्षक नितीन पारधी देवरी,बिटरक्षक एस.एल.कुंभरे किटाडी-1, बिटरक्षक टी.जी. गायधने डोंगरगाव ( न्या.),बिट रक्षक ए.यु. बडोले किटाडी-2,बिटरक्षक एस.ए. गायकवाड रेंगोळा सोबत होते. यांनी प्रसंगावधान ओळखून जखमी मजुराला मानसिक धीर देत सहकार्य केले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.