देवेंद्रजींनी मविआचे नाक कापले..!

देवेंद्रजींनी मविआचे नाक कापले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️डॉ अनिल पावशेकर

नुकतेच महाराष्ट्रात बारावीच्या निकालापाठोपाठ राज्यसभेचा निकाल लागला असून महाविकास आघाडीचे बारा वाजलेले आहेत. सहाव्या जागेसाठी झालेल्या रोमांचक सामन्यात ट्रिपल मल्लांना धोबीपछाड देत फडणवीसांनी फड जिंकला आहे. हम करे सो कायदा या फुशारकीत जगणाऱ्या बेडूकांनी फुगून बैल होण्याचा प्रयत्न केला परंतु देवेंद्रजींच्या दणक्याने तिन्ही मल्ल गारद झालेले आहेत. अर्थातच या रोमहर्षक सामन्यात धनंजय महाडिक मॅन ऑफ दी मॅच ठरले तर देवेंद्रजींना मॅन ऑफ दी सिरीजचा बहुमान मिळाला आहे.

खरेतर महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकून भाजप सत्ता स्थापनेत अग्रेसर होती. मात्र अचानक डकवर्थ लुईस मेथडने महाविकास आघाडी सरकार उदयास आले. त्यातच सत्तेची नशा अशी काही रोमारोमांत भिनली की आपणच एकमेव या ब्रह्मांडाचे उध्दार कर्ते आहोत अशी स्वप्ने सत्ताधाऱ्यांना पडू लागली. आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही या भ्रमात ते नांदू लागले. याच गुर्मीतून मग अर्णव ते केतकी व्हाया कंगणा सारख्या प्रकरणांना उत येऊ लागला. एखाद्याने टिका केली तर त्याला झोडपणे असो की मंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन चामडी लोंबवणे असो,, सर्वकाही बिनधास्तपणे सुरू होते.

एस टी कर्मचाऱ्यांचा संप असो की स्पर्धा परिक्षांचा गोंधळ असो कोणाचाच पायपोस कोणाच्या पायी नव्हता. १०५ घरी बसवल्याचा हर्षवायू झालेल्यांना कधी पंतप्रधान पदाचे तर कधी थेट २५ वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे दिवास्वप्न पडत होते. तर तिकडे अमर अकबर अँथनी सरकारचे दोन मंत्री उलाला उलाला प्रकरणी वलयांकित होते तर दोन मंत्री आपल्या अचाट आर्थिक कामगिरीने सरकारी पाहुणचार झोडत आहेत. निश्चितच जनता मुकपणे हे सर्व न्याहाळत होती. मात्र यांच्या दांडगाई, दडपशाहीपुढे सर्वच हतबल होते. या दुष्टचक्राला कुठेतरी चाप बसणे गरजेचं होतं आणि तसेही आजवर कोणाचाच अहंकार टिकला नाही कारण “अहंकारसे तीन गये धन वैभव वंश, ना मानो तो फिर देखो रावण कौरव कंस” याची आठवण सत्ताधाऱ्यांना असायला हवी होती.

अखेर राज्यसभा निवडणूकीचे पडघम वाजले आणि जनतेला कुठेतरी या सरकारचा हिशोब चुकता करण्याची तीव्र इच्छा झाली. अर्थातच या निवडणुकीत जनतेचा प्रत्यक्ष सहभाग नसतो परंतु त्यांचे प्रतिनिधी ही मोहिम नक्कीच फत्ते करतील यात तिळमात्र शंका नव्हती. त्यातच तिन तिघाडा काम बिघाडा सरकारने सहाव्या जागेसाठी राजहट्ट केला. मात्र संख्याबळ पाहता करंगळी सुजली तरी डोंगराएवढी होत नाही हे सत्य नाकारून कसे चालणार होते. त्यातच संभाजीराजेंना डावलून सत्ताधाऱ्यांनी रोष ओढवून घेतला होता.

सोळाव वरीस धोक्याचं असतं तसंच राज्यसभेची सहावी जागा धोक्याची होती. सेनेला तिचे सगेसोयरे, पक्षअपक्ष किती प्रामाणिकपणे साथ देतील हे गौडबंगालच होते. कांग्रेसची अवस्था तर भुले बिसरे गीत सारखी होती. युपीचे पार्सल मस्तकी बसल्याने त्यांच्या दुःखाला पारावर उरला नव्हता. तरीपण जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया करत ते मैदानात उतरले होते. तसेही त्यांनी नाराजी, असंतोष, प्रादेशिक अन्याय, राजीनामे सारखी वावटळे उडवली परंतु ती दिल्लीपर्यंत जाईपर्यंत हवेत विरून गेली. त्यामानाने राष्ट्रवादीच्या दोन्ही हातात लाडू होते. सेना, कांग्रेस सारखी अगतिकता,व्यथा त्यांच्या गावीही नव्हती.

तर दुसरीकडे देवेंद्रजींनी नेमकी परिस्थिती हेरून आखणी केली. पंचतारांकीत दंडबैठकात वेळ दवडण्यापेक्षा आवश्यक ती व्युहरचना रचली. मविआ दंडाच्या बेडक्या फुगवून विजयाचे निशाण दाखवत होती. परंतु त्यांचा सामना तेल लावलेल्या मातीतल्या पहेलवानाशी आहे हे ते विसरले. अखेर सामना अटीतटीचा झाला आणि मविआ तोंडघशी पडली. घरी बसलेल्यांनी हवेत उडणाऱ्या १७० जणांचा बाजार उठवला. अमर अकबर अँथनी ला अखेर देवेंद्र नावाच्या किशनलालने बाप कोण आहे हे दाखवून दिले. आपल्याच गुर्मीत असलेल्या आघाडीच्या तंबूचे कळस देवेंद्रजींनी लिलया कापून नेले.

वास्तविकत: केवळ एका जागी पटकनी बसल्याने या सरकारमध्ये खळबळ माजेल असे अजिबात वाटत नाही. तरीपण कुठेतरी याप्रकरणी विद्यमान सरकारचे नाक नक्कीच कापले गेल्याची भावना आहे. प्रत्येक वेळी तीन नापास मिळून एका मेरीटला हरवू शकत नाही. ओसाड रानात एरंडाचा उदो उदो असल्याप्रमाणे हे सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत होते. मात्र सहाव्या जागेने त्यांना सातवे आसमान जरूर दाखवले आहे.

बाजारू विचारवंत असोत की स्वस्तातले चाणाक्य असो, राज्यसभेची जागा जिंकणे हे येरागबाळ्याच काम तर नव्हेच. शिवाय बिनकामाची तोंडपाटीलकी केली तर कसे तोंडघशी पडल्या जाते हे या निमित्ताने दिसून आले. देवेंद्रजींच्या सभ्य सुसंस्कृत, अभ्यासू नेतृत्वाने ट्रिपल टपाल दिल्लीऐवजी गल्लीत परत पाठवले. राज्यात या निवडणूकीचे निकाल पाहता भाजप मेरीट मध्ये, राष्ट्रवादी, कांग्रेस फर्स्ट क्लासमध्ये पास झालेत तर सेना वरपास झाली असे म्हणता येईल. यानिमित्ताने निवडणूकीत तोंडाने फुलझड्या उडवणाऱ्यांनी हे नक्की लक्षात ठेवावे.

*”झुठी शान के परिंदे ही जादा फडफडाते है”*
*”बाज के उडाण में कभी आवाज नहीं होती”*

डॉ. अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles