Home नागपूर नवरसपूर्ण निसर्ग

नवरसपूर्ण निसर्ग

59

नवरसपूर्ण निसर्गपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वृंदा करमरकर, सांगली

निसर्ग आपला गुरु खराच पण तो जातीचा कलाकार आहे. मला तो आगळावेगळा भासतो. साहित्यातले नवरस सर्वश्रुत आहेत. श्रृंगार, वीर, करुण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र, शांत हे ते रस. पहाट सरतासरता रविराजाचे आगमन होणार असते.अरुण रथावर तो आरुढ होतो आणि केवळ त्याच्या चाहुलीने पूर्वा लालेलाल होते. हा शृंगार रसच मोर लांडोरीला भुलवण्यासाठी आपला राजवर्खी पिसारा फुलवून नर्तनमग्न होतो. कोकिळ पंचमस्वर छेडत कूजनगान करत़ो ते आपल्या प्रियेसाठीच ना?हाच तो शृंगाररस वादळी रात्र, काळे काळे मेघ नभात दाटलेले..त्यात वाऱ्याचे घोंघावणं.. जणू काळेकभिन्न राक्षस हातात वीजेच्या तळपत्या तलवारी घेऊन घमासान युध्द करताहेत.हा वीररस..!

एक पौराणिक आख्यायिका आहे. त्यानुसार चकोर आणि चकोरीला शाप आहे.त्यामुळे रात्री ते दोघे एकमेकांपासून वेगळे होतात.कारण त्या दोघांमध्ये रात्री कमलपत्र येते. ते दोघे एकमेकांना पाहू शकत नाहीत.ही विर हवेदना करूण रस दर्शवते. अद्भूत रस निसर्गात ठायीठायी दिसतो. सागराचे खारेजल प्राशन करुन मेघ नभातून अमृतमय स हस्त्रधारा वर्षतात. सूक्ष्म बीजातून मोठे वृक्ष आकाराला येतात.हाच तो अद्भूत रस.. हास्य रसाची सुखद शिंपण कुठे नसते.?फुले उमलतात व सुगंधाची लयलूट करतात,वाऱ्याच्या तालावर हिरवी राने-पाने डोलतात.लहान मुले खळीदार हास्याने मंत्रमुग्ध करतात. हाच हास्यरस.

मात्र भयानक, बीभत्स, रौद्र रस खूपदा हातातहात घालूनच भेटतात…भयाण वादळ जणू’ ‘त्सुनामी” प्रमाणे झेपावते. सागराच्या पर्वतप्राय लाटा सभोवताल कवेत घेतात… क्रूरपणे.. ज्वालामुखी विस्फोटात झाडेझाडोरे,सजीव गिळंकृत होतात…सर्वत्र किंकाळ्या, आक्रोश, जणूप्रलय, शिवाचे तांडव, भयानक, बीभत्स, रौद्र रसाचे हेच प्रलयंकारी दर्शन. रात्र चांदणी..वाळू रुपेरी..चंदन शीतल वारे..संथ वाहणारी नदी.,तिचं आरस्पानी पाणी आणि त्यातील चंद्रबिंब.जणू शीतलशा अमृतवर्षावात सृष्टीराणी भिजून चिंब होतीय . हीच तर “शांतरसाची बरसात ”
आता म्हणावेसे वाटतं… “ही निसर्ग-राणी’ नवरसांनी भरली।
नवरसांच्या नवरत्नांची कटी मेखला ल्याली।

वृंदा (चित्रा)करमरकर.
सांगली, जिल्हा:सांगली
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह.