
ऐतिहासिक वारसा लाभलेलं माझं गाव ‘नगरसुल’
काशिनाथ पैठणकर, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील येवला हे प्रसिध्द पैठणीचं गाव आणि या गावापासून १२ कि मी अंतरावर नारंदी नदीच्या काठावर वसलेल माझं ‘नगरसुल’ हे गाव. गावात अठरापगड जातीधर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. गावाला पौराणिक व ऐतिहासिक वारसा असून हे गावं ‘नहूस’राजाची नगरी होती. या राजाने घोर तपश्चर्या करून भगवान शंकराकडे एक वर मागितला, की मला स्वर्गात जागा द्या! देवाने प्रसन्न होऊन तथास्तू म्हटले आणि एक दिवस राजा ही नगरी घेऊन स्वर्गात निघाला, हे पाहून ब्रम्हदेव चिंतीत झाले! त्यांनी स्वर्गातून एक अस्र राजावर सोडले. नहुस राजाची नगरी उलटी होऊन खाली पडली,अशी अख्यायिका असून आजही गावाच्या पांढरीत उत्तखनन केले असता देवदेवतांच्या मूर्ती, गाडगी, मडकी, रांजण, इतकेच काय, पांढरीत गाडलेली घर सुध्दा उलटीच आढळतात.
गावाच्या चारी दिशांना चार वेस असून बुरुज व तटबंदी असलेला राजवाडा आहे. राजमहालला लागूनच प्राचीन मुरलीधर मंदिर असून, मंदिरात आजारी भावाची सुश्रुषा करणारी बहीण आणि नाकाला पदर लावून नवऱ्याच्या जखमीवर पाणी टाकणारी पत्नी हे शिल्प आहे. बहीण भावाच्या प्रेमाचे ते प्रतीक असून त्यांचा महिमा ऐकून नारदमुनी मुरलीधरला भेटायला आले, ज्या ठिकाणी नारदाला मुरलीधरची बहीण भेटली त्याला मुळुबाईचा घाट असे म्हणतात. त्यांनी ज्या नदीत अंघोळ केली त्या नदीला ‘नारंदी’ हे नाव पडले, अशा नारंदी नदीच्या काठावर माझं नगरसुल हे गाव वसलेलं, असून राजमहालच्या भिंती, बुरुज तटबंदी यांच्या खुणा आपल्याला जागोजागी पहायला मिळतात. पांडव वनवासात असताना फिरत फिरत या नगरीत आले. नारंदी नदीत अंघोळी करून ते जेवायला बसले, त्यावेळी उत्तरेला असलेल्या अगस्ती ऋषींच्या अंकाई किल्ल्यावर पाऊस फुटला, तेंव्हा पांडवांनी जेवण होईपर्यंत येऊ नको असे सांगितले आणि खरोखर पाऊस थांबला, जेवण झाल्यावर पांडवांनी पश्चिम वेशीच्या दक्षिणेला असलेले महादेवाचे मंदिर कावडीने पाणी आणून भरवले,मग पाऊस आला अशी आख्यायिका असून पांडवांनी ज्या ठिकाणी अंघोळ केली त्या ठिकाणी आजही पांडवकुंड आहे तिथेच आज दशक्रिया विधीचे कार्यक्रम होतात.
आजही अंकाई किल्ल्यावर पाऊस फुटून नगरसुलच्या चारही बाजूने पडतो, पण गावावर तो येत नाही याची अनेक वेळा प्रचिती आलेली असून अनेक बुजुर्ग मंडळींनी आपले अनुभव सांगितले आहे. गावाच्या पश्चिमेला हनुमान मंदिर, पूर्वेला गणपती मंदिर, उत्तरेला खंडोबा मंदिर, दक्षिणेला वेताळ मंदिर असून ते गावाचे वैभव आहे. फाल्गुन पौर्णिमेला गावात खंडोबाची यात्रा भरते,भाविक कोपरगावहून पायी चालत (उत्तरकाशी) गोदावरी गंगेचे पाणी कावडीने आणून खंडोबाला अंघोळ घालतात, दुसऱ्या दिवशी नवसाचे चार भाविक (नवरदेव)बारागाडे ओढतता. खंडोबा गावाचे ग्रामदैवत असून,सर्वांची त्याच्यावर श्रध्दा आहे. तसेच गावाच्या दक्षिणेला रेल्वेच्या पुलाजवळ नारंदी नदीच्या काठावर एक महादेव मंदिर आहे. त्याच्या समोर दगडात कोरलेले ७ कंगोरे असलेले भव्य गोल असून त्यावर एक नंदी व किनाऱ्यावर गणपती आहे, ते ७ कंगोरे म्हणजे ७ मोठ्या कढाई असून त्या सोन्याने भरलेल्या आहे गणपती त्याचा रखवालदार आहे अशी आख्यायिका सांगितली जाते.
अलीकडच्या काळात तिथे एका दत्ताश्रमाची स्थापना झाली असून, अशा या सुंदर गावाला एक रल्वेस्टेशन लाभले आहे, त्याचे इंग्रजीच्या अपभ्रंशातून नागरसोल असे नामकरण होऊन माझ्या गावाच्या इतिहासात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशा या गावाची पौराणिक ऐतिहासिक माहिती मी लहान असतांना माझे आजोबा कै,श्रीपत बाबा व अनेक बुजूर्गानी सांगितली आहे, त्यांच्या स्मृतिस माझा कोटीकोटी प्रणाम..!
गुरूपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा…!!
काशिनाथ पैठणकर
नगरसुल, जि.नाशिक