
गटशिक्षणाधिकारी भास्कर साखरकर यांची शाळा बाह्य सर्वेक्षण अंतर्गत रेनकापूर शाळेस सदिच्छा भेट
समुद्रपूर: जिल्हा परिषद शिक्षण विभाग वर्धा अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात शाळा बाह्य सर्वेक्षण सुरू असून या मोहिमेंतर्गत जिल्हात एकही मूल शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहू नये या उद्देशाने ही मोहिम प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने सुरू असून, आज दि.१३ जुलै रोजी समुद्रपूर पंचायत समितीचे मा.गटशिक्षणाधिकारी भास्कर साखरकर व साधनव्यक्ती श्रीकांत कावटे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रेनकापूर येथे सदिच्छा भेट दिली.
‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ या मोहिमेअंतर्गत रेनकापूर वार्ड नंबर 17 येथे भेट दिली असता, शाळेचे मुख्यध्यापक येनुरकर सर व कृष्णा तिमासे सर(प्रगणक)शाळाबाह्य सर्वेक्षण करत होते. मा.गटशिक्षणाधिकारी साखरकर यांनी फेर सर्वेक्षण केले असता, अंश ज्ञानेश्वर निकेश्वर वय ९ वर्ष हा मुलगा बाहेरगावी शाळेत दाखल असून त्यांच्या आई वडिलांच्या घरघुती अडचणीमुळे आपल्या आजोबाकडे राहत असल्याचे पालकांकडून समजले. सध्या तो शाळाबाह्य असल्यामुळे त्याला शाळेचे मुख्याध्यापक येनुरकर सर यांनी जिल्हा परिषद शाळा रेनकापूर येथे वयानुरूप वर्ग ३ री मध्ये प्रवेश देण्यात येईल असे कळविले.
दरम्यान, मोहिम यशस्वी करण्यासाठी काटेकोर पद्धतीने शाळबाह्य सर्वेक्षण सुरू असल्याचे गटशिक्षणाधिकारी समुद्रपुर यांनी सांगितले. सर्वेक्षणात साधनव्यक्ती श्रीकांत कावटे, शाळेचे मु.अ.श्री.सुरेश येनुरकर सर , प्रगणक कृष्णा तिमासे व इतर शिक्षकवर्ग याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.