
म.रा.प्राथ.शिक्षक संघातर्फे जिल्हाधिका-यांना अतिवृष्टीमुळे सुटी घोषित करण्याबाबत निवेदन
वर्धा/समुद्रपूर: जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून संततधार सुरू असून अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे समुद्रपूर तालुक्यातील शाळांना सुटी घोषीत करण्याबाबत आज दि १४ जुलै रोजी म.रा.प्राथ.शिक्षक संघातर्फे जिल्हाधिका-यांना तहसीलदार समुद्रपूर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
राज्यात सर्वदूर मागील चार- पाच दिवसापासून मुसळधार पाऊस आणि सततच्या अतिवृष्टीने जनजीवन प्रभावित झालेले आहे. अशातच नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहे. वर्धा जिल्ह्यातही सर्वत्र अशीच पूरपरिस्थिती आहे. जिल्ह्यातील मोठे शहर, मध्यम शहर व इतर अनेक गावातील शाळांमध्ये हजारो विद्यार्थी ग्रामीण खेडे भागातून शिक्षणासाठी येतात. रोजच्या मार्गक्रमणात त्यांना नदी,नाले पार करावे लागते. वर्तमान स्थितीत अतिवृष्टीमुळे नदी,नाले दुथडी भरुन वाहत असून सगळीकडे पूरपरीस्थिती आहे.
अश्या कठीण प्रसंगात विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या बालवय आणि किशोरवय स्थितीचा विचार केल्यास नको ते धैर्य विद्यार्थी करु शकतात. अपघात/धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूरपरिस्थिती व संभाव्य धोका लक्षात घेता अतिवृष्टीचा जोर कमी होईपर्यंत शाळांना सुट्टी घोषीत करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मा. जिल्हाधिकारी,वर्धा यांना मा. तहसीलदार समुद्रपूर यांचे मार्फत पाठविण्यात आले आहे. याप्रसंगी शिक्षक संघाचे अजय गावंडे (हिंगणघाट विभाग प्रमुख)विशाल केदार,आशिष ढेकन,कृष्णा तिमासे आणि राहुल पाटील उपस्थित होते.