
गुरूजींच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया 18 जुलैनंतर
पल्लवी पाटील, विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया 31 मे पर्यंत पूर्ण करावयाची होती, मात्र सुगम, दुर्गम शाळांच्या निवडीची प्रक्रिया लांबल्यामुळे बदल्यांबाबत साशंकताच होती. तरीही शिक्षण विभागाकडून प्रत्येक जिल्हयातील शिक्षकांची वैयक्तिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरुन ठेवण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, त्याप्रमाणे कार्यवाही झाली असून 23 जूनला ऑनलाईन माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर राज्यातील सरकार बदलल्यामुळे बदल्यांची प्रक्रिया थांबेल अशी शक्यता होती. परंतु प्रशासनाकडून कार्यवाही सुरुच ठेवल्यामुळे पहिल्या शैक्षणिक सत्रानंतर बदल्या केल्या जावू शकतात.
प्राथमिक शिक्षकांची पदे 15 टक्क्याहून अधिक रिक्त असल्यामुळे आंतर आंतरजिल्हा बदल्या करु नयेत असे आदेश होते. मात्र आता 18 जुलैनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार असल्याने गुरूजींच्या बदल्यांचा मार्ग सुकर झाला आहे.
आंतरजिल्हा बदल्यांसाठी शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरुन घेतल्यानंतर बदल्यांची यादी जाहीर केली जाईल. ही प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हांतर्गत बदलीसाठी शिक्षकांकडून बदली पाहिजे असलेल्या शाळांची नावे मागवून घेण्यात येतील. प्राधान्यक्रमानुसार 30 शाळांची नावे शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर भरावयाची आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात याला सुरुवात होणार आहे.