
बहरच्या निमित्ताने…..अनुभवलेले क्षण. (भाग : ३)
नातं कोणतं तुझं नि माझं…..कृतज्ञतेच्या आसवांनी मन माझं भिजं..!
रिक्षाने श्रीक्षेत्र देवगडचा प्रवास सुरु झाला. रिक्षात आधीच बसून असलेली ताई आमची आस्थेने विचारपूस करत होती . आम्ही दोघीपण उत्सुकतेने कशासाठी आलो ते सांगत होतो. ती सुद्धा कौतुकाने ऐकत होती. मलापण देवगडलाच जायचयं असं सांगत होती. म्हटलं चला सोबत झाली. पहिल्या रिक्षातून देवगड फाट्याला पैसे देऊन उतरलो . तिथून दुसरी रिक्षा करायची होती. ती ताई पण आमच्यासोबत उतरली. उतरताना माझी कपड्यांची बँग मी नको म्हणत असताना उचलली आणि दुसऱ्या रिक्षात सुद्धा तिनेच ठेवली. आजूबाजूची गव्हाची हिरवी सोनेरी शेते बघत , गप्पा करत कधी देवगड आले कळलेच नाही.
आता उतरुन नियोजित भक्त निवासातील खोलीकडे प्रस्थान करायचे होते. मी बँग उचलून चालायला लागणार इतक्यात ती मघाशीचीच ताई परत बँग उचलून आमच्यासोबत चालू लागली. दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये तिने ती बँग सुखरुप पोहचवून दिली. मी तिला त्याचा मोबदला देऊ केला. पण ती नकारच देत होती. शेवटी अनिच्छेनेच तिने ती भेट स्विकारली.
काय होतं तिचं नि माझं नातं….कधीही मी एकटी प्रवासाला न जाणारी पण माझा प्रवास या अनाहूतपणे भेटलेल्या व्यक्ती सुखकर करत होत्या. एक मात्र खरे की , आपण निर्मळ मनाने कधी कोणाची मदत केली, तर देवसुद्धा कोणत्या ना कोणत्या रुपाने आपल्याला मदत पोहचवितो याची खात्री पटली. मी सश्रद्ध आहे…अंधश्रद्ध नाही . रोज कुठलीही पूजापाठ करत नाही. कारण वेळेअभावी आदरणीय सासूबाईच ती धुरा सांभाळतात . कधी संधी मिळाल्यास करतेही पूजा, देवदर्शनही करते. मात्र माझ्या हातून छोट्यातले छोटे सत्कार्य कसे होईल यासाठी मी प्रयत्नशील असते . कुणाचे मन दुखावले जाणार नाही , याची काळजी घेते माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मी निर्मिकाला शोधते आणि बहुधा याचेच फळ मला कोणत्या ना कोणत्या रुपात मिळत असावे , असे वाटते . तरीपण माझ्या हातून चुका होतातच तेव्हा पुढल्यावेळी ती चूक टाळण्याचा प्रयत्न करते. (क्रमशः )
वैशाली उत्तम अंड्रस्कर
तुकुम ता. जि. चंद्रपूर
लेखिका/ कवयित्री/सहप्रशासक/ मुख्य परीक्षक/ संकलक