आरस्पानी सौंदर्याचा आरसा

आरस्पानी सौंदर्याचा आरसा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“पानी रे पानी तेरा रंग कैसा’
जिसमें मिला दो लगे उस जैसा”

स्वच्छ, नितळ मनात आकाश सामावून घेणारं अन् त्यासारखंच विशाल रूप पांघरणारं निळंशार पाणी.. कुठल्याही रंगात मिसळलं तर त्यात एकरूप होणारं.. कुणीही त्यात डोकावलं तरी प्रतिबिंब दाखवणारं..पाणी रे पाणी तुझं सौंदर्य आरस्पानी. सत्तावीसातून नऊ गेले किती राहीले.. शून्य.. हो ना.. सत्तावीस नक्षत्रापैकी नऊ नक्षत्रे पावसाची..तीच नऊ नसतील तर शून्य उरतील असा त्याचा अर्थ.. पाणी रे पाणी.. इतके मोठे महत्त्व तुझे जीवनी.. नव्हे नव्हे जीवनच नाही तुझ्यावाचुनी.

अथांग जागा व्यापून राहिले तर ‘सिंधू..’ होते तरीही एका मर्यादेत स्वतःस बांधून ठेवते. इवला थेंब होऊन तृणपात्यावर विसावते तेव्हा चांदणलकाकी घेऊन ‘दवबिंदू’ होऊन झुलते.. मनात मळभ दाटते तेव्हा डोळ्यातून ओघळले की ‘दु:खाश्रू..’ सुखात मन भरून येतं तेव्हा ‘सुखाश्रू’ होऊन पापणकाठावर विसावते.. बाष्परूप येता होते ‘ढग’.. ढगातून ओघळता ‘पाऊसधारा’ तर कधी ‘गारा’.. जलौघ होऊन वाहते तेव्हा ‘प्रवाह’ पळे.. एका जागी साठले तर ‘तळे..’ पाणी रे पाणी रूपे तुझी अशी सांगू मी किती..?

“लाथ मारीन तिथं पाणी काढीन”, असा आत्मविश्वास ठेवून वाग असे कितीदा सांगितले, तरी त्याच्या पालथ्या घड्यावर पाणी‌.. त्याच्यासाठी कितीही रक्ताचं पाणी केलं तरी ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या त्याच्या स्वभावाने अखेर स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं.. शत्रूचं पाणी जोखून त्याला पाणी पाजायच्या मनसुब्यावर मात्र शेवटी त्याने पाणीच फिरवले.. आणि ‘आमच्या तोंडचं पाणी पळालं’. पाहिलंत.. पाणी रे पाणी.. तुझ्या रूपात मराठी भाषेत कितीतरी आहेत वाक्प्रचार आणि म्हणी..!

पाणी..एक मुलभूत गरज. फक्त तृषार्ताचीच तहान भागवते असं नाही; तर एखाद्या भुकेल्या पोटाची आग विझवायलाही मदत करते. पण, कधीतरी हेच पाणी कमी पडतं, तेव्हा पाणी पाणी करून जीव कासावीस होतो. तर कधी हेच अतिप्रमाणात बरसलं तर मोठं संकट होऊन उभं राहतं. पाणी म्हणजे, जीवन असे म्हंटले जाते, मात्र, हेच पाणी कधीकधी नाकातोंडात जाते तेव्हा जीवनच संपवते.. तुझी ही दोन्ही रूपे अनुभवणारे मोठ्या अभिमानाने सांगतात आम्ही चार पावसाळे जास्त पाहिले आहेत.

‘पाणी रे पाणी’ हे जगणं व्यापून टाकणारं.. आज समोर आले ते चित्र चारोळी स्पर्धेसाठी. आधी आठवल्या त्या ‘पानी रे पानी तेरा रंग कैसा..’ या ओळी. धरणात साठलेलं हे पाणी कितीतरी शहरांची तहान भागवतं. शेतीसाठी धावत येतं अन् बांध घातलेलं हे पाणी मनाशीही नातं जोडतं. या सर्वांची योग्य सांगड घालत ‌आज तुम्हा सर्वांची लेखणीही तितकीच दिमाखदारपणे शब्दरूपात बरसली.

स्वाती मराडे, पुणे
लेखिका/ कवयित्री/सहप्रशासक/ परीक्षक/ संकलक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles