

नागपुरात आजपासून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा शुभारंभ
_जनतेने उपक्रमात उल्हासात सहभागी व्हावे; जिल्हाधिकारी आर. विमला_
*इमारती सजल्या तिरंगी रंगात, 14 तारखेला फाळणीवरील प्रदर्शनाचे उद्घाटन*
*15 पर्यंत प्रत्येक घरावर सन्मानाने तिरंगा लावण्याचे आवाहन*
नागपूर,दि. 12 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘हरघर तिरंगा’ या उपक्रमाचा शुभारंभ उद्या 13 ऑगस्ट रोजी होणार असून 15 पर्यंत साजरा होणार आहे. याशिवाय प्रत्येक शासकीय कार्यालयाने पुढील तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहे. जिल्हा प्रशासनाने 14 ऑगस्ट रोजी नव्यापिढीला फाळणीच्या वेदना माहिती व्हाव्यात यासाठी विभाजन विभिषिका स्मृती दिवसानिमित्त 14 ऑगस्टला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सायंकाळी 4.00 वाजता सेतू केंद्रातील या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रातिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी. याच उद्देशाने सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे.
तर देश स्वतंत्र होत असतांना झालेल्या फाळणीचे दु:ख व त्याच्या वेदना सामान्य जनतेला नव्या पिढीला कळाव्यात यासाठी केंद्रशासनाने फाळणीच्या वेदना दाखविणारे प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत चित्रप्रदर्शन लावण्यात येत आहे. तसेच फाळणीचे दु:ख सोसल्या कुटुंबाचा सन्मान नागरिकत्व दाखल्याचे वितरण करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाला संबोधित करणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर झेंडा उपक्रम जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिक घरी झेंडा फडकविणार आहेत. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये. यासाठी आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा, याबाबत ध्वज संहिते माहिती दिली आहे. या ध्वजसंहितेचे सर्व नागरिकांनी पालन करावे, कोणीही प्लॅस्टीक व कागदी झेंडे लावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
शासकीय कार्यालयास ध्वजसंहिता नियमाप्रमाणे सकाळी ध्वज फडकावून सध्याकाळी उतरविणे अत्यावश्यक आहे. तथापि घरासाठी ही ध्वजसंहिता लागू राहणार नाही, 13 ऑगस्टला सकाळी झेंडा उभारुन 15 ऑगस्टला सायंकाळी सन्मानाने तो उतरवावा. परंतु ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.
ध्वज (तिरंगा) ग्रामपंचायत, पंचायत समिती, स्वस्त धान्य दुकान व काही ठिकाणी बचत गटाकडे उपलब्ध आहेत. त्यासोबत प्राधान्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येईल. शाळामध्ये एकाच घरातील दोन व जास्त भावंड असल्यास दोघांना मिळून एकच तिरंगा वाटप करण्यात येईल. तसेच यानंतर जे ध्वज शिल्लक राहतील ते ध्वज गावातील आर्थिक दुर्बल नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत वितरीत करण्यात येईल.