मी पाहिलेले… देवदूत

मी पाहिलेले… देवदूत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

इंदू मुडे, ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर

ईश्वरीय शक्तीचं दुसरं रूप, म्हणेजच देवदूत. असे म्हणतात की, देव प्रत्येक ठिकाणी मदतीला नसतो, म्हणून माणसातूनच, काही दयाळू लोकांना देवदूत म्हणून नेमतो. ते ईश्वरीय रूप मी त्या दिवशी अनुभवलं, डोळ्यांनी पाहिलं. दोन आठवड्यापूर्वी माझ्या धाकल्या लेकीचं ऑफिस सुरु झाल्यामुळे ती नागपूर येथून पुण्यात ‘शिफ्ट’ झाली. नागपूर येथील सर्व सामान पॅकर्सने पाठवून, आम्ही दोघे पती पत्नी ट्रेनने पुणे गाठलं. सामानाचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतर दहा दिवसांनी परतीच्या प्रवासाला निघालो.

पुण्याच्या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी कॅब बुक करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, बुकिंग होतं नव्हती. शेवटी एक कॅब बुक झाली आणि आम्हा दोघांना सोडायला माझी मुलगी सोबत आली. कारण काही वर्षापूर्वी आमच्या सरांना अर्धांगवायूचा त्रास झालेला, त्यांच्या एका हाताला व पायाला बळ नाही, त्यामुळे आधारविना ते चालू शकत नाहीत. आम्ही सोबत स्टेशन च्या दिशेने निघालो. काही अंतरावरच कळले की, आज खूप ट्रॅफिक आहे. त्यामुळे कॅबवाले बुकिंग घेतं नव्हते.

रस्त्यावर वाहनांची चिक्कार गर्दी, ग्रीन सिग्नल असूनही गाडी पुढे सरकत नव्हती. आमची ट्रेन आहे…सांगितल्यावर,
ड्रायव्हर जागा मिळेल तिथून पुढे जाण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत, गाडी वेगाने पळवत होता. शेवटी स्टेशन गाठलं. ट्रेन सुटायला काही मिनिटेच उरली होती, म्हणून हे बोलले आम्हाला, तुम्ही दोघी एक्सीलेटर ने सामानासह पुढे जा. मी चढू शकत नाही. पायऱ्याने रेलिंगच्या आधाराने मी येतो.
आधीच वेळ झालेला, म्हणून माझी मुलगी एक बॅग घेऊन समोर निघून गेली, हे कसे येणार या विचारात मी मागेच राहिले. माझ्या सोबत दोनबॅग होत्या. तेवढ्यात पोलिसांचं आठ नऊ लोकांचं, एक मोठं पथक सहा ते सात मोठया श्वानासोबत तिथे आले. सोबत आणलेल्या स्पीकर मधून ते काहीतरी अनाऊन्स करीत होते. यांच्या काळजीत, माझे त्याकडे लक्ष नव्हते. पण अचानक पळापळ सुरु झाली, त्यामुळे मी थोडी घाबरले, एक्सीलेटरकडे धाव घेतली, आणि प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर पोहोचले. जिथं ट्रेन उभी होती. माझी मुलगी खालीच माझी वाट बघत होती.

मला बोलली, “मम्मी तू बॅगा घेऊन ट्रेन मध्ये चढ, मी पापाला घेऊन येते.” मी घाईघाईत चढले, आणि लगेच ट्रेन सुरु झाली. काय करावे मला कळेना. पुन्हा ती ओरडली, मम्मी… बॅग फेक….उतर लवकर …तोपर्यंत गाडीने वेग धरला होता.
मी एक बॅग फेकली, दुसरी कुणालातरी फेकायला सांगितली आणि उडी घेतली. हवेच्या वेगामुळे मी समोरच्या दिशेने फेकल्या गेले, मला तोल सावरायला वेळ लागला. कुणी तरी माझी दुसरी बॅग बाहेर फेकली, माझ्या पासून किती तरी दूर अंतरावर ती पडली. ट्रेन पुढे पुढे जातं होती, तेवढ्यात कुणीतरी ट्रेनची चैन ओढली. ट्रेनचा वेग कमी झाला, लोकं मला चढायला सांगत होते, पण मी कशी चढणार? … हे आजून पर्यंत यायचेचं होते. गेटपासून प्लॅटफॉर्म क्रमांक सहा पर्यंतचे अंतर, पायऱ्याने पार करणे सोपं नव्हते. माझी तगमग होतं होती. गाडी परत सुरु झाली.

माझी मुलगी तेथे उभे असलेल्या, रेल्वे पोलीस, आणि बाहेरून आलेल्या पोलीस पथकाला थोडं थांबा, माझे पापा चालू शकत नाहीत म्हणून विनंती करीत होती. ज्या पोलीस वाल्याकडे स्पीकर होता, तो काही ऐकून न घेता, ‘तुम्ही उशिरा का आले?’ म्हणून आमच्यावर स्पीकर मधून जोरजोरात ओरडत होता, उपदेश देतं होता. आणि ट्रेन आमच्या डोळ्यासमोर पुढे पुढे जातं होती. मी खाली पडलेली बॅग आणायला धावले, रेल्वे पोलिसांनी मला अडवलं, त्यांना वाटलं, मी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रेनचे शेवटले दोन डब्बे उरले होते, आणि माझी मुलगी पापाला घेऊन , वेगाने खाली उरतली. आम्ही परत रिकवेस्ट केली, यांनी हात जोडले, वेगाने चालून थकलेले, घामाचिंब, पायात बळ नसतांनाही सारा जीव ओतून पाय पुढे ओढत वेगाने चालत असतांना, डावा हात अक्षरशः थरथरायला लागला होता. मी परत घाबरले. गाडीत बसलेले सर्व लोकं आमच्याकडे बघत होते. पाहता पाहता ट्रेन शेवटल्या डब्यासह आमच्या डोळ्यासमोरून पुढे निघून गेली आणि काही अंतरावर जावून परत थांबली. लोकं ओरडले, ‘जा बसा’.. ज्यांची गाडी सुटली होती ते वेगाने घावत गेले, डब्ब्यात शिरले, आम्ही आजुनही खालीच… धावत होतो.

एक बॅग घेऊन, मुलगी समोर गेली, तिच्यामागे मी संपूर्ण ताकदीशी बॅग ओढत धावत होते, ओढतांना बॅग उलटी झालेली, सरळ करायला ही वेळ नव्हता, जोर लावून ओढत गाडीच्या शेवटच्या डब्याजवळ पोहचताच, अचानक वजन हलके वाटले, मी वळून बघितलं तर काय……सुटबुटात दमदार व्यक्तीमत्व असलेले, एक गृहस्थ हातात वायरलेस फोन घेऊन माझी बॅग एका बाजूने उचलून माझ्या मागे धावतांना मी पहिले…त्यावेळी मला ते देवदूत वाटले. मला म्हणाले, ” सावकाश… घाबरू नका, गाडी उभी आहे…. ते गृहस्थ ट्रेनचे गार्ड होते. ट्रेन पुढे गेली तेव्हा, शेवटल्या डब्यातून, आमची अवस्था पाहून, चालती ट्रेन थांबवली. आणि ते देवदूत मदतीला धावले. मुलींनी आणि त्या देवदूतानी यांना हात धरून गाडीत चढवले आणि सेकंदात गाडी सुरु झाली. मुलीला बाय करायला सुद्धा मिळाला नाही.

चालत्या ट्रेनमध्ये, एकावर एक बॅगा ठेवून ओढत, डोळ्यात अश्रूच्या धारा घेऊन, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाताना, एका तरुणाने यांना विचारले, “कुठल्या डब्याच रिझर्वेशन आहे? हे बोलले G –9.”तुम्ही कसे जाणार, खूप लांब आहे, चला मी तुम्हाला पोचून देतो, म्हणून त्यांनी माझ्या हातातील एक बॅग घेतली, तो तरुण ‘देवदूत’ बनून मदतीला आला आणि आम्हाला रिझर्वेशन असलेल्या डब्यापर्यंत पर्यंत पोहचवले. त्या देवदूताचे उपकार मानायला माझ्याकडे शब्दच नव्हते. होते ते फक्त डोळ्यातून वाहणारे अश्रू. त्या दिवशी खरंच मी माणसातला ‘देवदूत’ बघितला.

हा थरार अनुभवल्यावर एक प्रकर्षाने जाणवले.आपण मंगळावर झेप घेतली. परंतु, वृद्ध,अपंग आणि कमकुवत लोकांसाठी आपल्याकडे आजुनही पाहिजे त्या सुविधा नाहीत. याची फार खंत वाटली. फार त्रास होतो, जेव्हा आपण हे सगळं अनुभवतो. पुण्याला रेल्वे स्टेशनवर एक्सिलेटर आहे; पण सदृढ माणुसही पहिल्यांदा चढतो. तेव्हा त्याचाही तोल जातो. सावरायला काही सेकंद घेतो.
मग काय त्यावर, पायात बळ नसणारे अपंग, अंगात त्राण नसणारे वृद्ध….खरंच चढू शकतात? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

इंदू मुडे, ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles