
रौद्र दामिनीचे नर्तन…!!
वीज नर्तन
वर्षेचे आगमन
ऋतू दर्शन
‘सजल श्याम घन गर्जत आले, बरसत आज तुषार, आता जीवनमय संसार’.. होय, चराचर सृष्टी ग्रीष्मदाहाच्या तप्त अग्निज्वाळात होरपळून निघत असताना अचानक बेधुंद वारा सुटतो.. आकाशाला झाकोळून टाकणाऱ्या सावळ्या मेघांचे सुरु होते घनगंभीर गर्जन.. नि कृष्णमेघांच्या नौबतींच्या तालावर हृदयास कंपीत करणाऱ्या गडगडाटासह रौद्र दामिनी चे सुरु होते नर्तन..नि हेच ते वर्षाराणी चे रुप दावणारे संकेतरूपी दर्पण.. कृष्णमेघ ॠतूराज्ञी वर्षेच्या आगमनाची द्वाही फिरवू लागताच चराचराला होतो आनंद.. उदार अंतःकरणाने वर्षाराणी धरतीवर ओतू लागते अमृतकुंभातील संजीवन..नि तृषार्त धरती घटाघटा पिऊन टाकते हे आनंदघन ..नि रोमरोमी पुलकित होते तिचे तनमन ..दरवळतो सगळीकडे मातीचा मृदगंध …हाच तर सर्जनशीलतेचा असतो विजय.. नि खऱ्या अर्थाने सुरू होते नव जीवन.
खरच ग्रीष्माने पोळून निघालेल्या जिवनदाहात वळीवाची सर अनंत हस्ते जलमौक्तीके उधळते तेव्हा तिच्या सहवासात पाहता पाहता सारा सृष्टीचा नूर बदलतो..नद्या नाल्यांच्या नादमय पदन्यासातून.. वृक्षलतांच्या पानाफुलातून..चैतन्यसोहळ्याची अनुभूती येते..त्यातून सर्वजण सुखावतात. असा हा पाऊस कधीकधी प्राक्तनाशी लपंडावही खेळतो…कधी शांत तर कधी घनघोर बरसतो …अचानक दामिनी रौद्र रूप धारण करते तेव्हा स॔हारक विध्वंस घडवितो..जनजीवन विस्कळीत करतो ..वाहतूक ठप्प करतो.. व कर्दनकाळही ठरतो..त्याचा रोष कधी ओल्या दुष्काळात तर कधी कोरड्या दुष्काळात अनुभवास येतो.. दिवसभर धुवांधार बरसला तर चराचर सृष्टी उध्वस्त करतो. पण ‘जल’ जीवन असल्यामुळे त्याच्याशिवाय आपण जीवनाची कल्पनाच करू शकत नाही म्हणूनच निसर्गतः होणारे ऋतू बदल मनुजास स्वीकारावेच लागतात. त्याशिवाय भुतलावर जीवन अशक्य म्हणून त्याच्या छटा मोहक असोत वा रौद्र त्या कवी मनाला भुरळ घालतात.. निसर्गाच्या अंगप्रत्यंगातून ह्याच छटेतील नेमके क्षण आज हायकू काव्यात रेखाटायचे होते. ते क्षण अनेक शिलेदारांनी अचूक रेखाटण्याचा प्रयत्न केला. असेच उत्कृष्ट लेखन सातत्याने करीत राहा. त्यासाठी अभिनंदनीय शुभेच्छा.
थोडसं समूहातील नवप्रतिभावंतांसाठी–
1. हायकू तीन ओळींचा असावा.
2. पहिल्या ओळीत पाच अक्षरे
3. दुसऱ्या ओळीत सात अक्षरे
4. तिसऱ्या ओळीत पाच अक्षरे
अशी एकूण सतरा अक्षरांची रचना पद्धती असावी 5/7/5
5. पहिली ओळ व तिसरी ओळ.. किंवा.. दुसरी व तिसरी ओळ यात यमक साधलेला असावा.
6. अंतर्गत रचना लयबद्ध असावी.
7. पहिल्या विषयओळीची दुसऱ्या ओळीत विस्तारता असावी .
8. तिसऱ्या ओळीत योग्य ती कलाटणी असावी .
उदा. विजेची टाळी
पाऊस अवकाळी
भूईच्या भाळी
आ.राहुल सर प्रत्येक वेळी साहित्याला नावीन्य देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या विषयकल्पनेतून हायकू विद्वत्तेचा फार मोठा ओघ वाचक साहित्यप्रेमींच्या काळजापर्यंत पोचावा असा उद्देश असतो. चला तर त्यावर आपण खरे उतरण्याचा प्रयत्न करूया .
प्रा, तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव, गोंदिया