
‘नवे शैक्षणिक धोरण फायदेशीर’; प्रा. डॉ. संजीव सोनावणे
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: “नव्या शैक्षणिक धोरणात एकांगी शिक्षणाचे तोटे कमी करून बहुशाखीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनाही बहुविध पर्याय उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे मुलांना आपल्या कलाने क्षेत्र निवड करता येईल” असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांनी व्यक्त केला. डॉ. भालबा विभुते लिखित ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चिकित्सा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
या कार्यक्रमात पुढे बोलताना डाॅ सोनवणे म्हणाले की, “एकशाखीय अभ्यासक्रमामुळे आजवर अनेक तोटे झाले. परंतु नव्या शैक्षणिक धोरणात महत्वाचा बदल करून जे बहुशाखीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना हवे ते पर्याय उपलब्ध असतील. शैक्षणिक प्रगतीसाठी येणाऱ्या काळात जसजशी नव्या धोरणाची अंमलबजावणी होत जाईल तसतसे यातील फायदेतोटे स्पष्ट होत जाईल.”
“1990 नंतर जागतिकीकरण आले आणि त्यातून शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा आली. यामागे आपला देश इतर देशांच्या तुलनेत मागे पडू नये, अशी भूमिका होती.पण धोरणे नीट राबवली गेली नाहीत तर अपयश येते. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणाची चिकित्सा आवश्यक आहे. नव्या धोरणात पंचसूत्री आहे, ज्यात परवडण्यासारखे शिक्षण आणि जबाबदारी हे नवे मुद्दे आहेत. पण त्याची अंमलबजावणी कशी होणार यावर पुढील यशापयश अवलंबून आहे,” असे मत डॉ. एन. जे. पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
“राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी दोन लाख सूचना आल्या होत्या. सध्या शिक्षकांच्या 60 टक्के जागा भरलेल्या नाहीत, अशात नवीन धोरणात किमान विद्यार्थी संख्येची मर्यादा घातल्याने पट गळतीचा धोका कसा टाळता येईल यावर विचार करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी प्रकाशित पुस्तकाचे लेखक श्री.भालबा विभुते यांनी मांडले.
राज्य आणि केंद्र सरकारात समन्वयाची गरज असल्याची अपेक्षा याप्रसंगी बोलताना डॉ. ढोले यांनी व्यक्त केली. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या दालनात आयोजित या कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार, डॉ. संजय ढोले आणि प्रकाशक अखिल मेहता उपस्थितीत होते.