
गोंदियाच्या जंगलात CT-1 नरभक्षी वाघाचा भयावह धुमाकूळ
_जंगलात जाणे टाळा-गोंदिया वनविभागाचा सतर्कतेचा इशारा_
प्रा तारका रूखमोडे, गोंदिया
गोंदिया: जिल्ह्यातील स्थानिक अर्जुनी मोरगाव CT-1 नावाचा नरभक्षी पट्टेदार वाघ गेल्या तीन दिवसांपासून वडसा जन व वन विभागात हैदोस घालतो आहे. आज सकाळच्या सुमारास अरुण नगर येथील विनय मंडल नावाच्या इसमावर झडप घालून त्याला दूर ओढत नेले,रक्त पिऊन झाल्यानंतर त्याचं मुंडक धडापासून वेगळं करून , अर्धा देह गिळंकृत केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरुण नगर ही संपूर्ण बंगाली वस्ती झाडीव्याप्त आहे. याच वाघाने काही दिवसांपूर्वीच कोंढाळा येथील दोन नागरिकांचा जीव घेतला होता. एवढ्यावरच न थांबता आत्ता अगदी बारा वाजेच्या सुमारास हाच नरभक्षी अर्जुनी/मोर. इटखेडा या रस्त्यावर चारचाकी वाहनचालकांच्या दृष्टोत्पत्तीस पडला त्यामुळे अर्जुनी मोरगावच्या वनविभागात त्याने प्रवेश केल्याने स्थानिक जनात भयानक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हाहाकार उडाला आहे.
गोंदिया वन विभागाने सकाळी व संध्याकाळी सर्व नागरिकांनी परिसरात फिरणे टाळावे व कामासाठी जाताना समूहाने जावे व व नागरिकांनी जंगलात जाण्याचे पूर्णतः टाळावे अशी सूचना वनविभागाकडून जनहितार्थ जारी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी CT-1 या पट्टेदार वाघाची शोध मोहीम सुरू केलेली आहे. संपूर्ण जनमाणसात एकच भयानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.