
धक्कादायक…!! राज्यात दररोज सात शेतकरी करताहेत आत्महत्या
नागपूर: महाराष्ट्रात ‘शेतकरी आत्महत्या’ हा राज्यासमोर गेले कित्येक वर्षांपासून न सुटणारा गंभीर प्रश्न बनला आहे. नागपूर, अमरावती व औरंगाबाद या विभागात शेतकरी आत्महत्येचा आकडा चिंता निर्माण करणारा आहे.
प्राप्त माहितीनुसार जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात दर दिवशी राज्यातील ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, हे कृषिप्रधान भारतातील विदारक सत्य आहे. साधारणपणे यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट या एकूण आठ महिन्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यात १७५, औरंगाबाद जिल्ह्यात ९२, बीड जिल्ह्यात १५, यवतमाळ जिल्ह्यात १४३, बुलढाणा १५६ तर वर्धा जिल्ह्यात १०० शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविली आहे.
यंदा निसर्गाने कृपा तर केली परंतु नंतर अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस, दुबार पेरणी, पीक नष्ट होणे किंवा सडणे अशा विविध समस्यांचा सामना करताना कर्जाचा भार वाढत गेल्याने अनेक शेतकरी खचले. परिवाराचा आर्थिक भार व वाढत्या जबाबदाऱ्या यातून तणावाखाली जात अनेक तरुण शेतकऱ्यांनी देखील आत्महत्या केल्या आहेत. नवीन सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत. यावर्षी अतिवृष्टीने हातचे पीक नुकसानग्रस्त झाल्याने शेवटी राज्य शासनाकडून भविष्यात काय उपाययोजना केल्या जातात व शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
अशावेळी शेतकऱ्यांनी खचून न जाता स्थिती नक्की बदलेल अशी मानसिकता ठेवणे आवश्यक आहे, केंद्र शासनाने कृषी विमा योजनेचे चुकारे करणे सुरु केले असून भविष्यात राज्य शासनाकडून देखील मदत मिळेलच तोवर शेतकऱ्यांनी स्थिर भूमिका घेणे गरजेचे आहे.