
“समाज जोडण्याचे काम साहित्यातून होते”; डाॅ. अशोक कामत
_श्रीनिवास-पद्मावती विवाह नाटक प्रकाशित_
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: “समाजाला जोडण्याचे काम साहित्य करीत असते, आजच्या प्रदुषित वातावरणात दीपक करंदीकरांसारखे कवी समाज जोडण्याचे काम आपल्या साहित्यातून सतत करीत असतात. करंदीकर यांनी नाटकासाठी निवडलेल्या विषय आणि 5 अंकी संगीत नाटक स्वरूपातली मांडणी आजच्या काळात कौतुकास्पद आहे” असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ अशोक कामत यांनी “श्रीनिवास – पद्मावती विवाह ” या नाटकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
कवी दीपक करंदीकर यांनी “श्रीनिवास पद्मावती विवाह” या पौराणिक विषयावर ५ अंकी संगीत नाटक लिहीले असून ‘आभा’ प्रकाशनाने ते सिध्द केले आहे. याचे प्रकाशन प्रसिध्द नाट्य अभिनेते व राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारूदत्त आफळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. पत्रकारभवन येथे झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आभा प्रकाशन, रंगत-संगत प्रतिष्ठान आणि कला संवर्धन मंडळ यांनी संयुक्तपणे केले होते. नाट्यचित्रपट लेखक श्रीनिवास भणगे,भरत नाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष श्री. अभय जबडे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
रंगतसंगत प्रतिष्ठानचे ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चारूदत्त आफळे यांनी मनोगत व्यक्त करताना संगीत नाटकाचे स्वागत करून म्हटले की, “नवे संगीत नाटक लिहीले जाणे हे आजच्या काळात विशेष असून असे नाटक रंगमंचावर आले पाहिजे” श्रीनिवास भणगे यांनी नाट्यविषयाचा थोडक्यात आढावा घेतला. श्री. अभय जबडे यांनी नाटक रंगमंचावर आणण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.श्री. दीपक करंदीकर यांनी आपली नाट्यलेखनामागची भूमिका मांडली. दीप्ती असवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. विनीता दाते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नाट्य रसिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.