
नागपूर – हैद्राबाद प्रवास आता साडे तीन तासातच; नितीन गडकरींची घोषणा
नागपूर : उपराजधानी नागपूर ते हैदराबाद हा रस्ता प्रशस्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सुमारे साडेपाचशे किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेतीन तासात पार करता येणार आहे. त्यामुळे हैदराबाद नागपूरच्या अगदी शेजारी येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दिवाळीनिमित्त त्यांनी बुधवारी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी गडकरी म्हणाले, येत्या वर्षभरात देशभरात २५ हजार कोटींचे रस्ते निर्माण करण्याचा मानस आहे. यात नागपूर आणि हैदराबाद मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या हैदराबादचे अंतर कापण्यासाठी रस्ते मार्गाने किमान आठ ते नऊ तास लागतात. त्यामुळे पूर्ण दिवसच जातो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा मार्ग सुपर फास्ट करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा सुद्धा तयार झाला आहे. अजनी रेल्वेस्थानकाच्या विकासाचा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी आता खापरी रेल्वे स्थानक विकसित करण्याचा विचार केला जात आहे. याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. हे स्थानक विकसित केल्यास प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी सोयीचे होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
*अजनी पुलावरचा प्रवास खडतरच*
अजनी रेल्वेस्थानकाबाबत कथित पर्यावरणप्रेमी आणि स्वयंघोषित स्वयंसेवकांची उठसूठ आंदोलने आणि न्यायालयात याचिका दाखल केल्या जात असल्यामुळे अजनी रेल्वे उड्डाण पूल आठ पदरी करण्याचे सोडून दिले आहे. त्यामुळे या पुलावरचा प्रवास खडतरच राहणार आहे. गडकरी यांनी अजनी रेल्वस्थानक, रेल्वे उड्डाण पूल तसेच शेजारची जागा अधिग्रहित करून मोठा प्रकल्प हाती घेतला होता. यामुळे शहराच्या चारही बाजूने अजनी स्थानकावर पोहचणे सहज सोपे होणार होते. याशिवाय वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगची समस्याही टळणार होती. मात्र, हा प्रकल्प रद्द करून खापरी रेल्वेस्थानक विकसित केले जाणार आहे. खरे तर अजनीच्या प्रकल्पासाठी १२०० कोटी मंजूर झाले होते. आता ते सुद्धा परत गेले आहेत.
*म्युझिकल फाऊंटेनचे ४० टक्के काम पूर्ण*
जगातील सर्वात उंच असलेले फुटाळा तलावातील म्युझिकल फाऊंटेनचे ४० टक्के काम झाले असून आणखी बरीच कामे त्या ठिकाणी होणार आहते. खुर्च्या लावण्याचे काम सुरू झाले असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.