
साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे बालदिनी बालआनंद मेळाव्याचे आयोजन
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे: येथील “साहित्य प्रेमी भगिनीमंडळ” ही नामवंत संस्था स्त्री लेखिकांच्या साहित्यावर संशोधनात्मक कार्य करणारी ध्येयनिष्ठ संस्था असून आजपर्यंत या संस्थेने स्त्रियांच्या कादंबरी, कथा, कविता, वैचारिक, ललित व समीक्षा अशा सर्व प्रकारातील लेखनाचा आढावा घेणारे कालबध्द खंड प्रकाशित केले आहेत. याच कार्याच्या अनुषंगाने साहित्यविषयक विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात. त्यापैकी दरवर्षी बालदिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यावेळी येत्या बाल दिनानिमित्त भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिना पासून पंधरा दिवस लहान मुलांमध्ये साहित्याची गोडी वाढवण्याच्या दृष्टीने “बाल आनंद मेळावा” उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावर्षी दि. 14 नोव्हेंबर या बालदिनाच्या मुहूर्तावर सुरुवात करून एकूण बारा शाळांमधील विद्यार्थ्यांशी संस्थेच्या सभासद भगिनी स्वतः संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी पुण्यातल्या अशा शाळांची निवड जाणीवपूर्वक करण्यात आली आहे, की ज्यामध्ये वंचित गटातील मुले प्रामुख्याने समाविष्ट आहेत, जेणेकरून त्यांना या आनंदाच्या पर्वणीचा लाभ घेता येईल.
या उपक्रमाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, प्रसिध्द कवयित्री अंजली कुलकर्णी, एकपात्री कलाकार कल्पना देशपांडे, बाल साहित्य लेखिका कविता मेहेंदळे या “साहित्यप्रेमी भगिनी मंडळा”च्या कार्यकारिणी विश्वस्त सभासद अनेक मान्यवर लेखिकांसह यात सक्रीय सहभागी होणार आहेत. याशिवाय, संस्थेच्या आणखी 50 सदस्य प्रत्यक्ष शाळांमध्ये सादरीकरणात सहभागी होऊन भरगच्च रंजक कार्यक्रम मुलांसाठी सादर करणार आहेत. या सादरीकरणाचे परीनिरीक्षण व परीक्षण करण्यासाठी मान्यवर जाणत्या लेखिकांची एक समितीसुध्दा नेमण्यात आली असून या समितीच्या वतीने काही अधिक चांगल्या सूचनांची अपेक्षा आहे.
या बाल आनंद मेळाव्यात वाचन संस्कृतीला पोषक असे विविध कार्यक्रम सादर करण्याचे नियोजन असून यामध्ये बालकथा, बालकविता, यांच्या अभिवाचनाबरोबरच विज्ञान, गणित, पर्यावरण या विषयांचीही मुलांची गोडी वाढावी यासाठी चित्रकला, संगीत गायन, कठपुतळ्यांचे खेळ , अशा विविध माध्यमातून ज्ञान व मनोरंजन अशा स्वरूपाचे कार्यक्रम सादर होतील. मंडळाच्या सभासद भगिनी या सादरीकरणात मुलांनाही प्रत्यक्ष सहभागी करून घेणार आहेत. याशिवाय “प्रश्न मंजुषा” या ज्ञानवर्धक कार्यक्रमात भाग घेणा-या मुलांना खास “सहभाग प्रशस्ती पत्रके” दिली जातील. यावेळी निवडलेल्या 12 शाळांना प्रत्येकी एक, असा बाल साहित्याच्या दर्जेदार पुस्तकांचा संच खास भेट दिला जाईल. सोबतच आणखी एका चांगल्या गोष्टीची यावेळी भर पडत असून साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने ‘किशोर’ मासिकाची बारा शाळांची वार्षिक वर्गणी, भेट स्वरूपात भरली जाणार आहे, जेणेकरून या शाळांमध्ये ‘किशोर’ हे लोकप्रिय मासिक वर्षभर उपलब्ध होईल.
अशा त-हेने या बाल आनंद मेळाव्याच्या भरीव उपक्रमातून मुलांमध्ये बालवयात वाचनाचे संस्कार, साहित्यप्रेम हे साध्य व्हावे, शिवाय यातून रंजकतेसोबतच विविध विषयात विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन व जागृती व्हावी, या उद्देशाने गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबविला जातो. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या प्रमुख विश्वस्त, प्रसिध्द लेखिका व साहित्यसंशोधक डॉ मंदाताई खांडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे आणि शाळांकडूनही या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.