“आत्मविश्वासाचे…आम्हासही पंख हवेत”; स्वाती मराडे

“आत्मविश्वासाचे…आम्हासही पंख हवेत”; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरूवारीय चित्र चारोळी परीक्षण_
➿➿➿➿🦅✍️🦅➿➿➿➿
आहेच तसं त्याचं
किती गूढ वागणं..
त्या नीलवर्णी आभाळाचं
मजला वेड लावणं…!

🌤️पहाट होताच सोनसळी केशरसडा टाकत क्षितिजावर लालिमा उधळून देतं. दिवसभर निळाई पांघरून व्यापकतेची जाणीव करून‌ देतं.. अन् त्याच रंगात जलाशी एकरुप होऊन जातं. कधी शुभ्र धुक्याची चादर ओढून, हिमपर्वताशी गट्टी करतं तर, कधी बिजलीचा थरार दाखवतं.. बर्फाच्या राशींना वाकुल्या दाखवत धवल ढगांना मिरवतं. तर कधी सावळे मेघ सोबतीला घेऊन ओथंबून जातं. कधी इंद्रधनूची कमान उभारून स्वागता उभं राहतं.. तर सांजसमयी कातर होऊन गूढ जगात नेतं.. क्षणात चांदणचुरा विखरून बालगोपाळांना जोजवतं.. अन् रूप चांदोबाचे दाखवून रातीशी बिलगतं.. किती किती विविध रूपं त्याची पण सगळं दुरूनच पहायचं.. मन खट्टू होतं अन् वाटतं या सगळ्याची सैर करायला आम्हांसही पंख हवेत..!

🦅खरंय ना.. मला पंख असते तर.. असा निबंध परिक्षेत जेव्हा लिहायला यायचा तेव्हा; अशाच कितीतरी कल्पनाविलासात मन रमायचं ना..! ओसाड जागेवर जसं काहीच उगवत नाही तसं कल्पनेचे पंख लावल्याशिवाय कवीमनही गगनात विहार करू शकत नाही. ते आकाश खुणावते तेव्हा नक्कीच वाटत असेल आम्हांस ही पंख हवे.. त्या कल्पनाशक्तीचे..!

“गगनभरारी घ्यायला
नकोच केवळ स्वप्न नवे
आत्मविश्वास नि जिद्दीचे
आम्हांसही पंख हवे..”

😀बालवयात पाहिलेली स्वप्न.. कल्पना काही औरच असतात. पण जाणत्या वयातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाची अखंड धडपड सुरू असते. अशीच एक तीही धडपडत असते तिच्या स्वप्नांचा पाठलाग करत. पण लहान असताना तिच्या पायात बांधलेल्या परंपरेच्या विविध शृंखलांनी बाहेर पडताच येत नाही.. आता जेव्हा तिच्यासमोरील उंबरठे सैल होतात… भरारी घ्यायला गगन साद घालते.. तेव्हा ती प्रयत्न करते, पण कुठेतरी अपयशाची भिती वाटते.. अन् तेव्हा तिला वाटते.. आम्हासही पंख हवे.. आत्मविश्वासाचे..! आकाश मुठीत घ्यायला.. स्वतःला सिद्ध करायला‌. आम्हांसही पंख हवे.. इच्छा आकांक्षांचे..जिद्दीचे.. योग्य दिशा दाखवणारे.. होय तेच.. ते पंख.. आत्मविश्वासाचे..!

🌷हेच आत्मविश्वासाचे पंख सर्वांच्या लेखणीला देण्यासाठी.. एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी.. कौतुक करण्यासाठी.. मराठीचे शिलेदार समूह धडपडत असतो.. बाकी कल्पनेचे पंख तर आपणा सर्वांच्या कवीमनाकडे आहेतच. गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेसाठी ‘आम्हांसही पंख हवे’ हा विषय आला नि समस्त कवीवर्यांची लेखणी कल्पनेच्या गगनात भरारी घेऊ लागली. कुणी आकाशात झेप घेतली तर कुणी मोकळा श्वास.. स्व अस्तित्वाचे.. आत्मविश्वासाचे.. स्वप्नांचे सुंदर पंख सजले.. अशीच तुमची लेखणी उंच विहारत राहो.. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐
🙏आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

स्वाती मराडे पुणे
मुख्य परीक्षक सहप्रशासक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles