‘मरावे परी फ्रिजरुपी उरावे’..!; डॉ अनिल पावशेकर

‘मरावे परी फ्रिजरुपी उरावे’..!; डॉ अनिल पावशेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नुकतेच दिल्ली येथील श्रद्धा हत्याकांड उघडकीस आले आणि समाजमन परत एकदा ढवळून निघाले आहे. कल्पनेपेक्षाही भयंकर घडलेल्या या कृत्याने मानव हा अजूनही पशू अवस्थेतच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आधुनिकतेचा हव्यास, मला कोणाचीही गरज नाही, मला सर्वकाही कळते, मी सज्ञान आहे, मी कमावती आहे, हम जमाने के साथ है, आईवडील नातेवाईक जणुकाही खलनायक आहेत अशा सर्व प्रकारच्या विचारांच्या परिपाकातून, कायद्याला वाकुल्या दाखवत ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. तसेच यानिमित्ताने केवळ मुलांना जन्माला घातले म्हणजे पालकांची कर्तव्यपुर्ती होते असे नाही तर व्यवस्थीत, निकोप, योग्य प्रकारे त्यांचे पालनपोषण केले नाही तर अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते.

झाले काय तर या हत्याकांडाला लव्ह जिहादचे लेबल लावले की सर्वकाही प्रश्न सुटल्यात जमा आहे असे अजिबात नाही. किंबहुना अशा घटना वारंवार का घडतात आणि नेमक्या हिंदू मुलीच का बळी पडतात याचाही विचार करणे तेवढेच गरजेचे आहे. यांत सर्वात पहिले मुद्दा येतो घरगुती कारणांचा. आजकाल मुलंबाळं झाले की आईवडिलांना आभाळ ठेंगणे वाटते. मुलांना जन्म देऊन त्यांनी कोणतेतरी पारलौकिक कार्य केल्याचा त्यांना भास होतो. यापूर्वी कोणी मुलांना जन्म दिला नाही आणि यापुढे कोणाला मुलंबाळं होणार नाही या थाटात आईवडीलांचा तोरा असतो. मात्र घराच्याच बाजूला मोकाट कुत्री दर सहा महिन्याला कमीतकमी अर्धा डझन पिल्ले देतात हे ते सोयीस्करपणे विसरतात.

कुटुंबात माय डॉटर माय प्रिंन्सेस पासून मेरा बेटा मेरा राजकुमारची टेप चालू होते भलेही मग कमरेला फाटकी चड्डी का असेना. यातच मग मुलांचे फाजील लाड चालू होते. आईवडील मुलांचे पालक असूनही जणुकाही ते मुलांचे सेवक असल्यासारखे वागतात. मुलांनी जे म्हटले ते घेऊन देतात, मग आर्थिक परिस्थिती असो वा नसो. मात्र बरेवाईट काय, योग्य काय हे सांगायचे विसरतात. सोबतच मुलांना ना ऐकवण्याची सवय लावतांना दिसत नाही. अशाच फाजील लाडांचे परिणाम म्हणून मुलांत व्हिआयपी सिंड्रोम तयार होतो, मुलं शेफारून जातात आणि आईवडिलांना कवडीची किंमत देत नाहीत.

यासोबतच कुटुंबातील सदस्यांत किती सौहार्दाचे वातावरण आहे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. पालकांचा आपसात सुसंवाद नसेल तर घराचे स्मशान व्हायला वेळ लागत नाही. कुठेकुठे पालक आपली जबाबदारी विसरून मुलाबाळांसमोर लैला मजनू सारखे राहतात. अथवा पटापट मुलं जन्माला घालून पालक आपल्या अलग विश्वात रमत असतात. तर कुठे मुलांना पालकांसमोर तोंड उघडण्याची परवानगी नसते. अशा आणि यासारख्या परिस्थिती मुळे मुलांचा भावनिक कोंडमारा होतो. यातून मग भावनाशून्य मुलं निपजतात. जोपर्यंत मुलं लहान आहेत, परावलंबी आहेत तोपर्यंत हा बालज्वालामुखी शांत असतो. युवावस्थेत हार्मोन्सचा तडका लागताच हा ज्वालामुखी उफाळून येतो.

मुलांना सर्वकाही घेऊन दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नव्हे तर त्यांना आपुलकीची, प्रेमाची सुद्धा गरज असते. परंतु आजकाल पालकांकडे एवढा वेळ असतोच कुठे? मग यातूनच कुठे कोणी प्रेमाचे जाळे फेकले तर अशी मुलं त्यात अलगद फसतात. आपल्याला कोणीतरी विचारतोय, भाव देतोय या कल्पनेनेच मुली भारावून जातात. तसेही आपली मुलं नक्की काय करतात, कोणाला भेटतात याचे काही सोयरसुतक नसल्याने टपलेल्या गिधाडांचे आयतेच फावते. सोबतच मुलं सज्ञान असली, कमावती असली तर वेगळे विचारायलाच नको.त्यातच गर्लफ्रेंड, ब्वॉयफ्रेंडला लिव्ह इन चे कोंदण लाभले की नैतिक अनैतिकतेचा संबंध येतोच कुठे?

खरेतर अशावेळी मुलींना आणखी जबाबदारीने वागायला हवे. कारण छुरी खरबुजेपे गिरे या खरबुजा छुरी पे गिरे, आखिर कटना तो खरबुजेको ही है. शिवाय आपण नक्की कोणासोबत जात आहोत याचे तारतम्य कोण बाळगणार? आपले रितीरिवाज काय,मान्यता काय, आवडनिवड काय याचा विचार करायलाच हवा. दुरून डोंगर साजरे असते मात्र डोंगरावर गेल्यावर दगडधोंडे असतात त्याचे काय? शिवाय अशा घटना वारंवार घडत असताना आपण सावध व्हायला नको काय? प्रत्येक वेळी विषाची परिक्षा करणे जरूरी असते काय? आईवडील, नातेवाईकांना काहीतरी समजत असेल तेंव्हाच त्यांनी आफताबच्या संबंधांचा विरोध केला असेल ना, आईवडील प्रत्येक वेळी बरोबर नसले तरी प्रत्येक वेळी चुकीचे कसे काय असू शकतात याचाही एकदा विचार करायला हवा होता.

राहिला प्रश्न आफताबचा तर जणुकाही ही एक समांतर व्यवस्था तर जाणुनबुजून तयार केली नाही ना असे वाटते. एवढे क्रौर्य करायला त्याचे हात धजावलेच कसे हा प्रश्न आहे. एवढा गुन्हा त्याने एकट्याने केला की आणखी कोणी त्यात सामील आहे याचाही तपास व्हायला हवा. श्रद्धाच्या शरीराचे पस्तीस तुकडे करेपर्यंत आणि विस दिवस ते फ्रिजमध्ये भरून ठेवेपर्यंत त्या सोसायटीत कोणालाच याचा सुगावा कसा काय लागला नसेल? किंबहुना एखाद्याला काही कल्पना आली असेल तरी मला काय त्याचे या मानसिकतेतून ही घटना दडली गेली असावी. केवळ आफताबच कशाला आजच्या युवापिढी समोर आपण काय वाढून ठेवलंय याचा मागोवा कोण घेणार? बालपणापासून ते युवावस्थेपर्यंत मग ते टीव्ही, व्हिडिओ गेम असो की सोशल मिडिया अथवा चित्रपट,,,! बलात्कार,खून, मारामाऱ्या सारख्या असंख्य घटना त्यांच्या नजरेखालून गेल्या असतात.

त्यातच सामाजिक जीवनात, सोशल मिडियात अनैतिकता, अनाचाराचे उदात्तीकरण त्यांच्यातल्या पशूला खतपाणी घालत असतात. कोणी समजवायला गेले तर त्याची अडाणी, गावरान, जुनाट विचारांचे, आउटडेटेड लोक म्हणून खिल्ली उडविली जाते. पहिले तर मुलांवर केवळ घरच्यांचाच नव्हे तर मोहल्यातील थोरमोठ्यांचा वचक राहत असे. आजकाल तर घरातले मोठे लहानांना वचकून राहतात. मग कसले संस्कार आणि कसली जीवनमुल्ये राहणार? शिवाय कायद्याचा धाक तरी कुठे उरला आहे? अन्यथा एवढं क्रौर्य करताना खुन्याने दहावेळा विचार केला असता. दोषींना सजा आणि पिडीतांना न्याय मिळण्याबाबत तर बोलायलाच नको. तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात पिडीतांचे अश्रू आटून जाते मात्र पदरात न्याय पडेल की नाही याची शाश्वती नसते.

अशा प्रकरणात फारतर जनता धरणे, आंदोलन, मोर्चा, निषेध यापलिकडे काय करणार! तसेही आरोपी आफताब असल्याने ढोंगी पुरोगामी, बॉलिवूड, बडी बिंदी आणि डर लगता है गॅंग या हत्याकांडाबाबत मुग गिळून बसणार. जन पळभर म्हणतील हाय हाय करत हे हत्याकांड पण काळाच्या विस्मृतीत जाईल. मात्र ही भुताटकी प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येईल तेंव्हाच आम्हाला जाग येईल काय हा प्रश्नच आहे. आज श्रद्धा गेली उद्या आणखी कोणी दुसरी जाईल, ही श्रृंखला कधी तुटणार याचे उत्तर कोण देईल? मुलींच्या नशिबात तंदुरी, सुटकेस ते फ्रिजपर्यंतचा हा जीवघेणा प्रवास कधी संपणार? एकट्या आफताबला फाशी देऊन खरेच ही समस्या सुटेल काय? केवळ पोलिस यंत्रणा आणि न्यायालयाच्या भरवशावर हा विषय सुटणार नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सोबतच माझी सामाजिक जबाबदारी जोपर्यंत आपण ओळखणार नाही, स्वीकारणार नाही तोपर्यंत अशाच अनेक श्रद्धांना आपल्याला श्रद्धांजली वाहावी लागणार. अर्थातच मुलींनी अशा दुर्दैवी घटनांतून योग्य तो बोध घ्यावा, अन्यथा मरावे परी फ्रिजरुपी उरावे यातून तुमची सुटका कोणीही करू शकणार नाही.

मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles