
आठवणीतील थंडीची चाहूल..!; सविता पाटील ठाकरे
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
कारगीलच्या युद्धात भारताने विजय मिळवला..आणि विजय वीर म्हणून तुझा गौरव करणाऱ्या गावातल्या त्या भन्नाट मिरवणुकीचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे. अरे, होय.. मला हेही आठवतंय तुझी सेवापूर्ती झाली आणि गावाने तुझा केलेला मोठा सत्कार सोहळा..! प्रत्येक वेळी तुझी देशसेवा पाहून मला तुझी बहिण असल्याचा अभिमान क्षणोक्षणी जाणवत होता.
सुखाला दृष्ट लागते अगदी तशीच दृष्ट लागली तुला. कोरोना रुपी वादळात तू उन्मळून पडला. लडाख, काश्मीरची थंडी सहज सहन करणारा तू. पण एवढ्या लहानशा वादळात स्वतःला सावरू शकला नाही. कसा विश्वास ठेवणार आम्ही? रक्ताचे पाणी करून सीमेवर भारत मातेचे रक्षण करणारा वीर जवान तू, पण त्या काळात हॉस्पिटल, रक्त, ऑक्सिजन, बेड काहीही मिळत नव्हतं तुला…. लाज वाटते मला या समाजाची अन् इथल्या व्यवस्थेची.
बावीस वर्षांपूर्वी तू माझ्या घरी आला होतास, तुझ्या या बहिणीचा नवा संसार पाहायला… अत्यंत कमी पगार, मुंबईची महागाई सारं तुला न सांगताही कळत होते. आज सारं आठवतेय मला.. कारण त्या वेळी तू मला एक लाल ब्लँकेट भेट दिले होते. आजही जपून ठेवलंय मी. दरवर्षी थंडीची चाहूल लागताच मी त्याला बाहेर काढायची आणि यांना मोठ्या अभिमानाने ऐकवायची हे माझ्या भावाने दिलंय मला. पहिल्यांदा तो आपल्या घरी आला; तेव्हा त्याला पांघरायलाही काही नव्हतं आपल्याकडे तेव्हा माझ्या परिस्थितीला न हसता मला सांभाळून घेतले त्याने.
पण यावर्षी माझी हिंमतच होत नाही ते बाहेर काढायची…तू गेलास आम्हाला सोडून मानलेले नाते कायमचे पोरके करून. मागच्या थंडीत कितीतरी वेळा भिजले रे ते…तुझ्या आठवणींच्या अश्रूधारांनी. आताही चाहूल थंडीची जाणवते आहे. थंडी कुणासाठी कशीही असेल पण माझ्यासाठी तर तुझ्या स्मृतींच्या आठवणींनी भरलेली आहे. सुखदुःख, आशानिराशा, ऊनसावल्या या प्रतिकात्मक खेळाप्रमाणे पानगळ आणि नंतर येणारी नवपालवी या दोन्ही गोष्टी आहेत. अलीकडे पूर्वीसारखी थंडी नसते. दिवाळीला पूर्वीसारखी पहाट शिरशिरी जाणवत नाही. उलट गरमच वाटते तरीही ऋतुचक्राचा बदल टिपायलाच हवा. काहीशा सुखकर व उबदार थंडीबद्दल मनातील भावफुलांनी सजवलेले हे शिशिर ऋतूचे वर्णन करताना एक कविता मनात साकारली –
शिशिर ऋतुचं गान गाऊया शिशिर ऋतुचं गान ।।धृ।।
कडाक्यातली गोठवणारी फुलतो काटा, गोड शिरशिरी वेळेवरती जाग येई परि साखरनिद्रा छान।।
चमचम दहिवर गवतावरती झाडेवेली गोठून जाती दवात भिजुनी कळ्या उमलती कुठे दिसेना पान।।
माझ्या संवेदनक्षम मनावर कोरलेल्या आठवणींना लेखणीत बांधण्याचे निमित्त झालं. ‘बुधवारीय काव्यरत्न स्पर्धा’. योगायोगाने चाहूल थंडीची हा विषय मिळाला आणि परवा माझ्या मनाचा झालेला कोंडमारा आज मी शब्दबद्ध केला. मला असंच आवडतं आजूबाजूचे वास्तव व स्वानुभावांना शब्दात बांधणे… मग ते काव्य असो की परीक्षण. मी कविता वाचत होती…कुणाची प्रेमाची चाहूल थंडीची होती… कुणाची वातावरणातील बदलांची होती. तर कुणाची उबदार वस्त्रांची, तर कुणाची पर्यटनाची. मला पुन्हा एकदा रात्रीच्या अंधारात बारे देणारा माझा शेतकरी बाप दिसला.
“वा-यागत बाप माझा रानात हिंडतो
ऊन पावसात तो रगत सांडतो,
नाही जाणवत त्याले चाहूल थंडीची
गाणं गाऊन तिले हसतच झेलतो..”
त्याला कसली आली चाहूल थंडीची. असो…! कविता करणे म्हणजे नेमकं वेगळे आहे तरी कसा.असा प्रश्न मी स्वतःला खूप वेळा विचारते कमी शब्दात मोठा भाव अविष्कार समोरच्याला ज्ञात झाला म्हणजे आपण यशस्वी झालो. कविता हा उत्स्फूर्त अविष्कार असतो. कवितेत हवाय रस, भाव, अर्थ आणि छानशी ओढ आणि सोबत शब्दांची लवचिक जोड. कविता ही कादंबरी नाही किंवा छोटी कथाही नाही. कवितेतल्या शब्दांना कवीला स्वतः साज चढवावा लागतो त्यामुळे ती सुंदर बनते अर्थात आज परीक्षणाच्या निमित्ताने काव्य वाचताना बऱ्याचशा गोष्टी मला पहावयास मिळाल्या. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन
अन् पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा..!!!
सविता पाटील ठाकरे सिलवासा