
‘मी पण नथुराम गोडसे बोलतोय’; नाट्यवादात कॉंग्रेसची उडी
अहमदनगर: महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रावर ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकावरून मंगळवारी रात्री वाद झाला. या नाटकात चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याचा आक्षेप घेत सावरकरप्रेमींनी घोषणाबाजी करून शेवटी नाटकात अडथळा आणली होता. आता या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालणाऱ्यांचा निषेध केला आहे. नथुराम गोडसेच जाहीर समर्थन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काळे यांनी केली आहे.
काळे यांनी सांगितले की, अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच जाहीर समर्थन केले. ‘मी नथुराम गोडसे असतो, तर मीही तेच केलं असत’ अस निंदनीय वक्तव्य केल आहे. हा देशद्रोह आहे. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे जाहीर उदात्तीकरण स्वतंत्र भारतात काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही. नाटकाला काँग्रेस संरक्षण देण्याचे काम करेल. प्रयोग बंद पाडणाऱ्यांवर आणि गोडसेच्या विकृतीचे समर्थन करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक करावी, अशी आमची मागणी आहे.