
‘शिल्पकार’ : ‘पांढऱ्या पायाची अवदसा’ होते ‘लक्ष्मी’!
_६१वी राज्य नाट्य स्पर्धा नागपूर केंद्र_
निरंजन मार्कंडेयवार, नागपूर
नागपूर : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ६१व्या महाराष्ट्र मराठी राज्य नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रावर गुरुवारी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात ‘शिल्पकार’ हे नाटक सादर झाले. लेखिका सुनंदा साठे यांनी उच्चभ्रू वर्गात होत असलेले भ्रुणहत्येचे प्रयत्न आणि त्यातून बचावलेल्या मुलीचा संघर्ष, हे सूत्र या कलाकृतीत हाताळले. दिग्दर्शक सतीश खेकाळे यांनी हे आशयसूत्र रसिकांपर्यंत पोचविले. टिळकनगर महिला मंडळ, नागपूर या संस्थेने ही कलाकृती सादर केली.
कथासूत्र : मध्यमवर्गीय मनोजला भक्ती आणि तन्वी या दोन मुली असतात. अशातच मनोजची पत्नी परत गर्भवती असल्याने मनोज गर्भजल परीक्षणाचा आग्रह धरतो. मुलगी असल्याचे कळल्याने तिसरी मुलगी नको यावर तो ठाम असतो. मात्र, त्याची पत्नी आग्रही असते. अखेर मुलगी जन्माला येते. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर मनोजच्या पत्नीचा मृत्यू होतो. तेव्हापासून तो या ‘नकुशी’ (नाटकातील उल्लेख ‘नकोशी’) मुलीचा सतत दु:स्वास करायला लागतो. तिचा उल्लेख ‘पांढऱ्या पायाची अवदसा’ असा करीत असतो. तिचे नावही ‘मरी’ असे ठेवलेले. तिला सतत मारझोड करणे, कोंडून ठेवणे, हीन वागणूक दिली जाते. घरची कामवाली गोदाबाईही मनोजप्रमाणेच तिला तुसडी वागणूक देत असते.
‘मरी’ लहान असतानाच एक दिवस मनोजचा मित्र राजीव आणि त्याची पत्नी पद्मा मनोजच्या घरी येतात. मरीचा चाललेला छळ त्यांच्या लक्षात येतो. ते मनोजची कानउघाडणी करतात. राजीव आणि पद्मा यांना अपत्य नसल्याने ते मरीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतात. मनोजला ते मरीला दत्तक म्हणून मागतात आणि आपल्या घरी घेऊन जातात. तिचे नाव मीरा ठेवतात. राजीव-पद्मा यांची मुलगी सोनमही मीराला आपली मैत्रिण म्हणून स्वीकारते.
काही वर्षानी मनोज हा राजीव-पद्माच्या घरी येतो. हा दिवस मीराच्या दहावीच्या निकालाचा असतो. मीराने ९५ टक्के मिळवलेले असतात. मनोजला त्याची चूक कळून येते. त्यानंतर काही वर्षे उलटतात. पुढे मुलाखतकर्ती शीतल ही कर्तबगार प्रौढ मीराची मुलाखत घेताना आपण बघतो. मीराने ‘मरी मीराश्रम’ स्थापन केलेला. त्यामागची प्रेरणा ती सांगते. सारे कुटुंब एकत्र येतं.
जे भोग आपल्या वाटय़ाला आलेत, ते इतरांच्या वाटय़ाला येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती ही ‘शिल्पकार’ ठरते, असा संदेश ही कलाकृती प्रेक्षकांना देते. बालपणची मरी, त्यानंतर दहावी झालेली मीरा आणि पुढे स्वकर्तृत्वावर ‘नकोशा’ मुलींसाठी ‘मीराश्रम’ स्थापन करणारी प्रौढ मीरा, अशा तीन भूमिकांमध्ये वावरणारी व्यक्तीरेखा ही या नाटकाची नायिका. या तीन अभिनेत्रींच्या माध्यमातून ‘शिल्पकार’ हे नाटक साकारते.
मनोजच्या भूमिकेतील राजा नरसापूरकर या कसदार अभिनेत्याची देहबोली आणि अभिनय वाखाणण्यासारखाच. विशेषत: उत्तरार्धातील अगतिक बापाच्या छटा दाद देण्यासारख्या. छोटय़ा मरीच्या भूमिकेतील शैवी पाठक या बाल अभिनेत्रीने रसिकांची चांगलीच दाद घेतली. भक्तीच्या भूमिकेतील आर्या आपटे आणि तन्वीच्या भूमिकेतील श्रेया करंदीकर या दोन बहिणींमधील तारुण्याच्या उंबरठय़ावर पाय ठेवतानाची संवादाची जुगलबंदीही रंगतदार.
मनोजचा फ्लॅट आणि त्यानंतर राजीव-पद्मा यांचे घर हे नेपथ्यकार शिरिष धर्माधिकारी यांनी कल्पकतेने मांडले. त्यानुरुप प्रकाशयोजनाही त्यांनी केलेली. मीराच्या मुलाखतीच्यावेळेस तिच्या सर्व पालकांना प्रेक्षकांमधून रंगमंचावर आणण्याची दिग्दर्शक सतीश खेकाळे यांची कल्पना दाद देण्यासारखीच.
मात्र, काही पात्रांचे अपुरे पाठांतर बरेचदा रसभंग करीत होते. प्रॉम्प्टिंगचा आवाज दूरवर ऐकू येत होता. दिवस पालटतील तसे वेषभूषा पालटण्यात काही ठिकाणी सातत्यभंग झालेला जाणवला. मीरा दरवर्षी दोन परीक्षा उत्तीर्ण होते, असा संवाद येतो, तो कोडय़ात टाकणारा वाटतो.
नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना शिरिष धर्माधिकारी, संगीत अभय पांडे, वेषभूषा तृप्ती पाठक, श्वेता देशपांडे, देवयानी आपटे, रंगमंच सहाय्य विनय लोहित यांचे तर, निर्मिती प्रमुख सुरेश साठे होते.
भूमिका आणि कलावंत पुढीलप्रमाणे : गोदाबाई (आसावरी डांगे), भक्ती (आर्या आपटे), तन्वी (श्रेया करंदीकर), छोटी मरी (शैवी पाठक), पप्पा मनोज (राजा नरसापूरकर), राजीव (समीर खरे), पद्मा (रेणुका करंदीकर), सोनम (स्वरा देशपांडे), मीरा (स्वरा मुंबर), शीतल (नुपूर देशपांडे), मोठी मीरा( रेणुका चुटके-चक्रदेव)