
‘झुंड’च्या बाबू छत्रीला घरफोडी प्रकरणात अटक
_नागपूर पोलीसांची कारवाई_
नागपूर: प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनयामुळे चर्चेत आलेल्या बाबू छत्री ऊर्फ प्रियांशू रवी क्षेत्री याला मानकापूर पोलिसांनी घरफोडी प्रकरणात अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी मध्ये घरफोडी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे ७५ हजारांचे दागिने लंपास केले होते.
या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी एका अल्पवयीनासह दोघांना अटक केली होती. चौकशीदरम्यान या घरफोडीत बाबूसुद्धा सहभागी असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिस आपल्या मागे असल्याचं कळताच बाबू फरार झाला होता. माञ बाबू गड्डीगोदाम परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली व त्यांनतर सापळा रचून पोलिसांनी मंगळवारी बाबूला अटक केली.
अटकेनंतर बाबुला न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत बाबूने दिलेल्या माहितीचे आधार घेत गड्डीगोदाममधील कबुतरांच्या पेटीत लपविलेले दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
काही दिवसांपूर्वी बाबू हा गांजा पिताना आढळला होता. त्यावेळी सदर पोलिसांनी देखिल त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती, बाबूच्या चौकशीत आणखीही काही घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असून मानकापूर पोलीस त्याच्याकडून कसून चौकशी करत आहे.