वेड लावणारी गावाकडची ‘माती’; स्वाती मराडे

वेड लावणारी गावाकडची ‘माती’; स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरूवारीय चित्र चारोळी परीक्षण_

*जन्म देते ती माता अन् जिच्यामुळे जीव‌ जगतो ती माती… उदरात असताना मातेची नाळ जुळलेली असते तर जन्म होताच ती मातीशी जुळते. लहान असताना जेवढं आईच्या कुशीत विसावतो तेवढीच मातीवर पावलं दुडूदुडू धावतात. याच मातीशी जेव्हा पाणी एकरूप होतं तेव्हा तो चिखल पाहून इवले कर लागतात कलाकुसर करायला.. चूलबोळकी बनवून पहिला लुटूपुटीचा संसार मांडला जातो तोही या मातीतच.. कधी साहसवेड अंगात भिनतं‌ अन् साकारतो किल्ला.. तर कधी नागपंचमीसाठी नाग, पोळ्यासाठी बैल तयार करताना मातीत मन रमून जातं…तर कधी चिमूटभर माती तोंडात टाकून तिचा आस्वादही घेतात.. बालपणाच्या कित्येक आठवणी या मातीशी जुळतात..!*

*माणूस समुद्रात जावो अथवा गगनात त्याला सुरक्षिततेची खात्री मिळते ती जमिनीवरच.. त्यासाठीच तर गगनभरारी घेतली तरी मातीत पाय घट्ट रोवायला त्याला आवडते.. आपला गाव सोडून कामानिमित्त बाहेर गेलेल्या माणसालाही आपली माती आपली माणसं मनापासून साद घालतात.. ज्या मातीत जन्म झाला त्याच मातीत माझा शेवटही व्हावा अशीच इच्छा असते त्याची.. हो ना..वेड लावते अशी जिवाला गावाकडची माती…!*

*तप्त झालेल्या मातीवर जेव्हा पावसाचं दान पडतं तेव्हा येणा-या मृदगंधापुढे जगातले सगळे अत्तरही फिके पडावेत. पावसाचं दान मिळालं की तिच्या कुशीत जे जे बीज पडते त्याला ती आई होऊन वाढवते. केवळ वाढवतेच असं नाही तर तिच्याच कुशीत प्रत्येक जीव चिरनिद्राही घेतो.. कदाचित म्हणूनच माती शब्दातच दडली आहे माता..!*

*कृषीवलाचीसुद्धा ती माताच.. म्हणूनच आपसूकच त्याचा टेकतो तिजचरणी माथा.. ते अनुभवून बहिणाबाई उत्स्फूर्तपणे म्हणतात,*

शेतामधी भाऊराया
खाले वाकला वाकला
त्यानं आपल्या कपायी
टिया मातीचा लावला…

*क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है.. ही माती केवळ माती न‌ राहता जननी, मायभूमी होते. तेव्हा तिचे रक्षणासाठी सैनिक प्राणपणाने लढतो. श्वासाश्वासावर तिचेच नाव कोरतो. तिच्याचसाठी यावं मरण अशी अभिलाषाही धरतो.. सौगंध है मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा.. अशी मातीची शपथही घेतो.*

*किती या मातीचे उपकार.. फेडणं तर शक्यच नाही.. म्हणूनच या मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ५ डिसेंबरला जागतिक माती दिन साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून चित्र चारोळी स्पर्धेसाठी ‘माती’ हा ऋणनिर्देश करणारा विषय आला. दिनकर दादांनी सुरूवातीलाच सुंदर नाळ जोडली.. अन् वैविधतेने रचना साकारत गेल्या. चारोळीत मातीचे ऋण सामावणे अशक्य पण तरीही आपण सर्वांनी हे खूप सुंदर शब्दबद्ध केले. जिथे नाळ जुळते तिथे मायाममता असतेच.. याचा प्रत्यय आला..सर्व सहभागी रचनाकारांचे अभिनंदन..💐*

स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक/ संकलक/ सहप्रशासक/ कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles