
सुखविंदर सिंग सुक्खु यांना हिमाचलच्या मुख्यमंत्री पदाची लॉटरी
हिमाचल प्रदेश: मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस पक्षाने सुखविंदर सिंग सुक्खू यांचे नाव निश्चित केले आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी रविवार होणार असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे सुखविंदर यांनी ते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले होते. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही. काँग्रेस पक्षाने मला राज्याची जबाबदारी दिली होती, पक्षाने मला बरेच काही दिले आहे, त्यामुळे पक्षाचा आदेश मी मान्य करणार, असे ते म्हणाले होते.
हिमाचल प्रदेशात काँग्रेस स्थिर सरकार देईल. पक्षाचे ४० आमदार आहेत, शिवाय ३ अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहेच, या व्यतिरिक्त भाजपचेच ७ ते ८ आमदार आम्हाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले होते.
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस कोणाची निवड करणार यावरून मोठा वाद झाला होता. सुखविंदर सिंग सुक्खू यांच्यासह प्रतिभासिंग, मुकेश अग्निहोत्री हे नेतेही मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत होते. त्यातून हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही झाली होती. त्यानंतर सर्व निर्णय हायकमांडकडे सोपवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.