
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला ‘शुअर्टी बाँड इन्शुरन्स’चा प्रारंभ
नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बजाज अलायन्झ कंपनीतर्फे भारतात प्रथमच सुरु करण्यात आलेल्या ‘शुअर्टी बाँड इन्शुरन्स’ सुविधेची सुरुवात केली.
या उत्पादनाची सुरुवात केल्यानंतर, केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, “भारत आता 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर योग्य पद्धतीने वाटचाल करत आहे. या विकासाच्या मार्गात विमा क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पायाभूत सुविधाविषयक प्रकल्प अधिक वेगाने राबविले जाणे महत्त्वाचे आहे कारण, पायाभूत सुविधा आणि खास करून रस्ते हे घटक आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यावश्यक आहेत. ‘शुअर्टी बाँड’च्या या नव्या साधनामुळे, रोकड सुलभता आणि क्षमता या दोन्हीच्या उपलब्धतेला नक्कीच चालना मिळेल.
या क्षेत्रांना मजबूत करण्यासाठी अशा उत्पादनांची मदत होईल. देशातील रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार केल्यामुळे, अधिक समृद्धी , वाढीव रोजगार संधी आणि जास्त प्रमाणात सामाजिक संपर्क सुविधा मिळेल असा ठाम विश्वास आम्हांला वाटतो. ‘शुअर्टी बाँड इन्शुरन्स’ची सुरुवात हे या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे, या महत्त्वाच्या उत्पादनाची सुरुवात करून बजाज अलायन्झ विमा कंपनीने अत्यंत उपयुक्त उपक्रम सुरु केला आहे हे पाहून मला आनंद झाला आहे.”
पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ‘शुअर्टी बाँड इन्शुरन्स’ एक हमी व्यवस्था म्हणून काम करेल आणि कंत्राटदार तसेच मूळ भांडवल या दोघांनाही सुरक्षित ठेवेल. हे उत्पादन, आजकालच्या वाढत्या प्रमाणात असुरक्षित वातावरणात काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या वैविध्यपूर्ण गटाच्या गरजा पूर्ण करेल.
शुअर्टी बाँड इन्शुरन्ससाठी कंत्राटदाराकडून बँक हमी व्यवस्थेमध्ये असते तशी, कोणत्याही मोठ्या तारणाची गरज नसेल त्यामुळे कंत्राटदाराकडे लक्षणीय प्रमाणात निधी उपलब्ध असेल आणि तो हा निधी व्यवसायाच्या विस्तारासाठी वापरू शकेल. या नव्या सुविधेमुळे, देशात येत्या काळात सुरु होणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास सुलभ होईल.