
@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*मेस्सी मॅजिकने अर्जेंटिना विजयी*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
*ल्युसेल आयकॉनीक स्टेडियम, दोहा इथे पार पडलेल्या फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शुट आऊट मध्ये फ्रान्सचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावला आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत निर्धारित वेळेसोबतच अतिरिक्त वेळेत आणि पेनल्टी शुट आऊटमध्ये मेस्सी मॅजिकपुढे फ्रान्सची दाळ शिजली नाही आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधानी रहावे लागले. प्रारंभीच्या सामन्यात सौदी संघाकडून धोबीपछाड बसूनही मेस्सीच्या संघाने आपला खेळ आणि दर्जा दोन्ही उंचावत अखेर विश्वचषकाला गवसणी घातली आहे. यासोबतच लिओ मेस्सीचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे अधुरे स्वप्न पूर्णत्वास आले आहे.*
*झाले काय तर फुटबॉल हा पृथ्वी ग्रहावरचा सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो. त्यातच दर चार वर्षांनी फिफाद्वारे फुटबॉलचा कुंभमेळा भरवला जातो. भलेही आपला देश या स्पर्धेत नसला तरी फुटबॉल प्रेमींची आपल्याकडे कमी नाही. शिवाय मॅराडोनाच्या अर्जेंटिना संघाला फुटबॉल विश्वात आगळेवेगळे वलय प्राप्त आहे. यामुळेच जेव्हा अर्जेंटिना संघ अंतिम सामन्यात पोहोचला तेव्हा फुटबॉल प्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सोबतच फ्रान्स हा प्रतिस्पर्धी संघ असल्याने ही लढत छातीत धडधड वाढवणारी असणार यात वादच नव्हता आणि झालेही तसेच.*
*भलेही फुटबॉलमध्ये अकरा खेळाडूंचा संघ असला तरी अर्जेंटिनाच्या लिओ मेस्सी आणि फ्रान्सच्या एम बाप्पेवर अवघ्या फुटबॉल विश्वाच्या नजरा खिळल्या होत्या. त्यातच मेस्सीने हा विश्वचषक जिंकून निवृत्तीचे संकेत दिल्याने चाहत्यांची भावनीक घालमेल सुरू झाली होती. खरेतर मेस्सी ची उंची तोलामोलाची. परंतु यामुळेच त्याला खेळतांना लोअर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा फायदा होतो. मग ते ड्रिबलींग असो की दिशा बदलने असो. यासोबतच मेस्सीचे चापल्य जबरदस्त असल्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंचे टॅकल तो सहजपणे मोडून काढत असतो. शिवाय चाली रचणे, त्यांचे गोलमध्ये रूपांतर करणे यात सध्यातरी त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. तसेच आक्रमण असो की बचाव संघाचा ताळमेळ तो उत्तम प्रकारे साधतो. यामुळेच मेस्सीला कधी जादुगार तर कधी गारुडी म्हटल्या जाते.*
*अर्जेंटिना संघाची मदार मेस्सी वर होती तशीच फ्रान्सची आशा आकांक्षा एम बाप्पेवर केंद्रीत होत्या. तेवीस वर्षाचा बाप्पे हा फ्रान्स संघाचा हॉर्स पॉवर आहे. काय ती त्याची अचाट ताकद, सोबतीला भन्नाट वेग आणि कमालीची अचूकता त्याला फुटबॉलच्या श्रेष्ठ खेळाडूंमध्ये स्थान देऊन जाते. गोल करताना बाप्पेकडे मेस्सी सारखी नाजुकता, हळुवारपणा आणि सहजसुंदरता नसली तर त्याच्या धडाकेबाज खेळीने प्रतिस्पर्धी संघ दिपून जातो. मुख्य म्हणजे त्याच्या ताकद आणि वेगाला आक्रमकतेची जोड मिळताच त्याला थोपवणे अशक्य कोटीतली गोष्ट असते. २०१८ ला फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात क्रोएशियाचा प्रतिकार ४/२ असा मोडून काढण्यात बाप्पेचा सिंहाचा वाटा होता. या विश्वचषकात अर्जेंटिना विरूद्ध दणादण तीन गोल करत बाप्पेने जी हॅटट्रिक केली ती पाहता, ‘बाप रे बाप सबसे पहले आप’ असेच म्हणावेसे वाटते.*
*दोन्ही संघाकडे सुपरस्टार असल्याने मामला फिफ्टी फिफ्टीचा होता. मॅराडोनाचा वारसदार मेस्सी तर बाप्पे थीअरी हेन्रीचे अपडेटेड व्हर्जन. सुपर संडेच्या ब्लॉकबस्टरला मेस्सीने तेवीसव्या मिनीटाला बोहणी करत सामन्यात रंगत आणली. भरीस भर म्हणून एंजेलो डी मारीयाने छत्तीसव्या मिनीटाला फ्रान्सच्या बचाव फळीला भगदाड पाडत आघाडी २/० अशी केली. पहिल्या हाफमध्ये बाप्पेची जादू चालली नाही आणि लढत एकतर्फी, मिळमिळीत तर होणार नाही अशी शंका वाटू लागली होती. तरीपण बाप्पे नावाचा बाजीगर हरलेली बाजी पलटवेल अशी फ्रान्सच्या चाहत्यांना आशा होती आणि दुसऱ्या हाफमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही.*
*दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सची अवस्था करा अथवा मरा अशी होती. अखेर सामना संपायला उणेपुरे दहा मिनिटे उरले असताना फ्रान्सला बाप्पे पावला. फ्रान्सने पेनल्टी क्षेत्रात धुमाकूळ घालताच पेनल्टी मिळवली ज्यावर बाप्पेने गोल नोंदवला आणि लगेचच त्याने डबल धमाका करत अर्जेंटिना चाहत्यांच्या काळजाला भोके पाडली. लढत बरोबरीत येताच मेस्सी चाहत्यांची अवस्था,,, सब कुछ अच्छा चल रहा था, एकदम से वक्त बदल दिए, जजबात बदल दिए, जीन्दगी बदल दी अशी झाली. बाप्पेच्या दोन गोलने अर्जेंटिना संघ जमिनीवर आला. ऐनवेळी अर्जेंटिना संघ सामन्याची लय घालवून बसला. फ्रान्स संघाने खेळाडू बदली करत फ्रेश लेग्ज आत आणल्याने निर्धारित वेळेत पिछाडी भरून काढत त्यांनी सामना बरोबरीत आणला होता.*
*घामाघूम झालेले दोन्ही संघ एक्स्ट्रा टाईमला उतरले आणि १०८ व्या मिनिटाला पुन्हा एकदा मेस्सी मॅजिक पहायला मिळाले. अत्यंत चतुरतेने आणि चपळाईने मेस्सीने गोल करत फ्रान्सच्या गोलरक्षकाला स्तब्ध केले. पुन्हा एकदा सामना अर्जेंटिना कडे झुकला होता. त्यातच यलो कार्डवाटप मोहिमेने जोर पकडला होता. दोन्ही संघ इरेला पेटले असल्याने रेफ्रीची चांगलीच दमछाक झाली होती. तरीपण दोन्ही संघ आणि त्यांच्या सुपरस्टार्सची पर्वा न करता रेफ्रींनी हायव्होल्टेज सामना उत्तम प्रकारे हाताळला. अर्जेंटिना विजयासमीप असताना पुन्हा एकदा बाप्पेने पेनल्टी वर गोल करून सामना पेनल्टी शुट आऊटवर नेऊन ठेवला. खरेतर ही अर्जेंटिना साठी इष्टापत्ती ठरली. कारण पेनल्टी शुट आऊटमध्ये अर्जेंटिनाचा रेकॉर्ड चांगला असल्याने ते बिनधास्त होते. तसेही अंतिम क्षणी अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने एक अफलातून गोल वाचवत संघाचे मनोबल वाढवले होते.*
*अखेर पेनल्टी शुट आऊटचा थरार सुरू झाला आणि बाप्पे, मेस्सीने चेंडू जाळीत भिरकावत आपापले कार्य उरकले. खरी कालवाकालव यापुढे सुरू झाली कारण यापुढे हे दोन्ही सुपरस्टार फक्त प्रेक्षकाचे काम करणार होते आणि आता सर्वस्वी जबाबदार उर्वरित खेळाडू आणि दोन्ही गोलरक्षकांवर होती. त्यातही अर्जेंटिनाचा ३० वर्षीय,साडे सहा फुट उंच गोलरक्षक इमीलीयानो मार्टीनेझ सरस होता. त्याने एकंदरीत ३९ पेनल्टीत सात पेनल्टी वाचवल्या होत्या. तर फ्रान्सचा ३५ वर्षीय, सव्वा सहा फुट उंच गोलरक्षक ह्युगो लॉरीसने ११६ पेनल्टीत १४ पेनल्टी रोखल्या होत्या.*
*अखेर अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने चपळता दाखवत दुसरी आणि तिसरी पेनल्टी अडवली तर फ्रान्सच्या ह्युगो लॉरीसला एकही पेनल्टी अडविता आली नाही. अर्जेंटिना तर्फे चौथ्या आणि निर्णायक पेनल्टीसाठी जेव्हा गोन्झालो मॉंटीएल गोलपोस्टकडे जात होता तेंव्हा जवळपास पाच करोड देशवासीयांच्या आशा आकांक्षा त्याच्यावर अवलंबून होत्या. तर फ्रान्सची जवळपास सात करोड जनता त्याची पेनल्टी हुकण्याची वाट बघत होती. मात्र दुसऱ्यावर अवलंबून राहून विजेतेपद कसे काय मिळणार? शेवटी गोन्झालो मॉंटीएलने गोल करत अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा विश्वचषक मिळवून दिला.बाप्पे असो की मेस्सी, दोघांनीही आपापल्या संघासाठी जीवाचे रान केले. मात्र मेस्सीला सहकाऱ्यांची जी साथ लाभली त्यामानाने बाप्पे एकाकी झुंजला. शिवाय अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने पेनल्टी शुट आऊटमध्ये भक्कम बचाव करत फ्रान्सचे आक्रमण परतवून लावले.*
*दोन्ही संघांची तुलना केली तर या सामन्यात अर्जेंटिनाचा खेळ सरस झाला. अर्जेंटिनाची पास अचूकता ८२% तर फ्रान्सची ७६% होती. सोबतच अर्जेंटिनाचे शॉट ऑन टार्गेट १० होते तर फ्रान्सचे अवघे ०५ होते. मुख्य म्हणजे मेस्सीने आक्रमणासोबतच बचाव करत संघाचे संतूलन राखले तर फ्रान्सची बचाव फळी बरेचदा वर खेळली आणि आत्मघात करून बसली. एकंदरीत काय तर संघात केवळ सुपरस्टार असून चालत नाही तर संघात ताळमेळ तेवढाच जरुरी आहे. ‘एक अकेला चना भाड नही झोंक सकता’ हे ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगीज संघाकडे आणि बाप्पेच्या फ्रान्स संघाकडे पाहून सहज लक्षात येते. फुटबॉलमध्ये युरोपियन आणि लॅटीन अमेरीकन देशांचा वरचष्मा असला तरी आफ्रीकन मोरोक्को संघ आणि द.कोरीया, जपान या आशियाई संघांनी नजरेत भरणारी कामगिरी करून दाखवली हे ही थोडकं नसे. मात्र अंतिम सामन्यातील मेस्सी, बाप्पेची जुगलबंदी दिर्घकाळ फुटबॉल प्रेमींच्या स्मरणात राहील हे मात्र नक्की आहे.*
********************************
दि. १९ डिसेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++