
शॉक देऊन पत्नीला मारले;दोन दिवस मृतदेहानजिकच झोपला
लखनऊ : देश गुन्हेगारी जगतात क्रमांक एकवर यायला लागल्याचे
चित्र सर्वत्र दिसून येत आहे. दिल्लीतील लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आफताब पूनावाला याने गर्लफ्रेंड श्रद्धाची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना लखीमपूर खेरी येथून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूरच्या गोला गोकरण भागात आरोपी मोहम्मद वासी याने पत्नीला करंट देऊन तिची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद वसीने काही वर्षांपूर्वी मुलीचा धर्म बदलून तिच्याशी लग्न केलं होतं. आता आरोपीने पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेह खोलीतच पुरला. एवढंच नाही तर पत्नी उषा शर्मा उर्फ अक्सा फातिमा हिची हत्या करून मृतदेह खोलीत पुरल्यानंतर पती 2 दिवस त्याच खोलीत झोपला होता. आता या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद वसी याचं त्याच्या पत्नीशी भांडण झालं होतं. यानंतर पत्नी रात्री झोपली तेव्हा त्याने तिचे हातपाय बांधले आणि नंतर लांब तार जोडून तिला विजेचा धक्का दिला. उषा शर्मा उर्फ अक्सा फातिमा हिच्या मृत्यूनंतर आरोपीने खोलीतच खड्डा केला आणि यात पत्नीला पुरलं.
पोलिसांनी सांगितलं की याबद्दल कोणाला समजू नये, यासाठी आरोपी दोन दिवस त्याच खोलीत झोपून राहिला. मात्र या प्रकरणाचा खुलासा कुटुंबातील लोकांनीच केला. आरोपीच्या आईला समजलं की मोहम्मदची पत्नी कुठे दिसत नाही. यामुळे तिने मुलाकडे विचारपूस केली. यानंतर आईनेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता समजलं की मोहम्मद वसीने खोलीतच पत्नीचा मृतदेह पुरला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी फातिमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याचे समजते.