‘लाल मातीशी’ नाळ जोडणारी कला; प्रा. तारका रूखमोडे

‘लाल मातीशी’ नाळ जोडणारी कला; प्रा. तारका रूखमोडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण_

मातीत लाल
खेळे कुस्ती कमाल
कौशल्यबाज

या लाल मातीतला ‘लाल’..वैभवी परंपरेचा कसलेला वारसदार. शक्तीला युक्तीची जोड देऊन चपळतेने मल्लविद्येचे खेळतो डाव प्रतिडाव शाहूपुरीतील तालमीतला ‘ढाण्या वाघ’असो की ‘खतरनाक पट्ट्या’असो हारजितीची पर्वा न करता स्वकौशल्याच्या बळावर देश पातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावर पदक मिळवून जपतो आखाडा संस्कृतीची शान. असा आमचा हा उरूस जत्रेतील मानाचं पान. माती ललाटी लावून बेभानपणे लढणारा पोलादी हिंद-ए-केसरी पैलवान.

‘कुस्ती’ आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढाया करीत आला त्यातूनच या द्वंद्वाचा उगम झाला. बुद्धीशिवाय बळ थिटे, बळाशिवाय बुद्धी पांगळी म्हणूनच, मन, मनगट, मेंदू यांच्या कौशल्यमयी त्रिवेणी संगमाचा सुरेख आविष्कार म्हणजे ‘कुस्ती’. मल्लयुद्ध, अंगयुद्ध, बाहूयुद्ध म्हणजेच लाक्षणिक अर्थाने प्रतिस्पर्ध्यावर शक्तीयुक्तीने मात करणे म्हणजेच ‘कुस्ती.’यात कलाजंग, ढाक, मोळी, आतील टांग, एकेरी पट, गदालोट, धोबीपछाड अशा विविध डावप्रकारांनी सजलेली कुस्ती हजारो वर्षापासून राजे महाराजे ते आज पर्यंत गावकुशीत मातीच्या मुशीत मनोरंजनाचं साधन व शक्तीप्रतिष्ठेचं मापन म्हणून कुस्तीचा रांगडा मैदानी खेळ नावारूपास आला.

मातीत ‘लाल’
लढते तरुणाई
जिंकते कुस्ती

मल्लविद्येचे माहेरघर म्हणून मान्यता पावलेल्या लालांना मातीत खेळताना कौशल्य पणास लावावे लागते,आपण अलगद पडलो तरी आपणास खरचटतं, पण येथे पैलवान कित्येकदा पडूनही योद्ध्यांना कसलीच इजा होत नाही याचं रहस्य काय बरं असेल? होय..तेच दडलंय या लाल मातीच्या कूसकिमयेत. पैलवानांची नाळ जुळलेली असते या लाल मातीशी. ज्याप्रमाणे बाळाचं नातं मातेशी मायेचं..तसेच मल्ल व मातीच नातं..आई ज्याप्रमाणे दूध पाजून बाळाचं संगोपन करते, तसंच संगोपन तालमीच्या मातीतून होते.ही मातीही तेवढीच ताकदवर, पैलवानांसाठी लाल मातीचा आखाडा बनवला जातो. लहानपणापासूनच लाल मातीत पैलवानास परिपक्व बनवले जातं. याच मातीत अंग तेजस्वी राहण्यासाठी जंतूनाशक हळद व सोनकाव काढा, किटकांनी मातीत प्रवेश करू नये म्हणून कडीलिंब, सकारात्मक ऊर्जा तयार होण्यासाठी भीमसेनी स्फटिकासम कापूर, दूध, तूप, ताक टाकून नैसर्गिक मिश्रण बनवून ते मिश्रण हलकेच मातीत मिसळवून मऊ व निर्जंतुक केली जाते.या आयुर्वेदिक खुराकीत मल्ल परिपक्व होतो, खेळताना या सकारात्मक ऊर्जेतून त्याला बळ प्राप्त होते.

याच ऊर्जेच्या बळावर त्या मातीच्या स्नेहबंधन गुणामुळे व संस्कारामुळे तो विश्व स्तरावरही विजयश्री प्राप्त करतो तो लाल मातीत दडलेल्या किमयेमुळेच ! ही माती कोणत्याही माळरानातील, पिकाऊशेतीतील अथवा नदीतील नसते तर ती डोंगरदरीच्या औटीतील पारखून तालमीत वाजत गाजत आणावी लागते.कारण तालमीची ती ‘लक्ष्मी’ असते.तिला पुजलं जातं,म्हणूनच ही माता मुलाला कशी बर दुखापत होऊ देणार?

एका घरातील एक तरी पुत्र आखाड्यात पाठवला जायचा,ते प्रतिष्ठेचं वैभवाचं प्रतीक समजलं जायचं.खाशाबा जाधव,दारासिंह ते अलका तोमर, साक्षी पर्यंत असे कितीतरी हिंद केसरींनी ऑलिंपिक क्रीडेत कुस्तीने मानाचे स्थान पटकावले..मल्लांचे डावपेची युद्ध बघण्यासाठी जत्रा असो वा मैदाने गर्दीने फुलायची,अशी ही जगण्यासाठी आवश्यक कला..

पण आज ही कला या भौतिक भोगवादाच्या गर्दीत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे,या भोगवादाच्या मागे न धावता तन व मन यात समतोल राखून शरीर सुदृढ ठेवणारी, बलसंवर्धन करून आत्मविश्वास वाढवणारी, मातीशी नाळ जोडणारी,समतेची शिकवण देणारी ही कला, या पारंपारिक आदर्श स्वास्थ्यवर्धक कलेचं विचारमंथन व्हावं..म्हणून आदरणीय राहुल सरांनी कदाचित हे चित्र दिलेलं…

यात्रेला साज
कुस्तीच्या दंगलीत
जिरतो माज

ही आ.हंसराजदादांची सुरेख यथार्थ रचना..अशा मार्मिक रचना करण्याचा प्रयत्न करा.. चित्रातील सर्व घटकातील सूक्ष्मतेलाही काव्यात उतरवण्याचा प्रयत्न करा.. सर्व प्रतिभावंत साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन..लिहिते व्हा ..
आ.राहुल सरांनी मला हायकू काव्यपरीक्षण लेखणाची संधी दिली त्याबद्दल हृदयस्त ॠणानुभार 🙏🙏

प्रा तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव,जि गोंदिया
मुख्य परीक्षक सहप्रशासक संकलक कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles