
राष्ट्रपतींनी केली इंदूर मधील ब्रह्मकुमारी सभागृह आणि अध्यात्मिक कलादालनाची पायाभरणी
नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मु यांनी आज (3 जानेवारी, 2023) राजस्थानमधील माउंट अबू येथे ब्रह्मकुमारींनी आयोजित केलेल्या ‘आध्यात्मिक सक्षमीकरणामधून उदयोन्मुख भारत’ या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ केला. त्यांनी तेलंगणामधील सिकंदराबाद इथल्या ब्रह्मकुमारीज सायलेन्स रिट्रीट सेंटरचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले आणि, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या ब्रह्मकुमारी सभागृह आणि आध्यात्मिक आर्ट गॅलरीची पायाभरणी केली.
संमेलनाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ब्रह्मकुमारी संस्थेशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यांनी राजयोगाची पद्धत शिकली, जी बाह्य भौतिक सोयी आणि घटनांपेक्षा आंतरिक आध्यात्मिक शक्तीला महत्त्व देते. यामुळे यांच्या जीवनात प्रकाश आणि उत्साह आला, ज्यावेळी त्यांना जीवनात अंधःकार आणि निराशा जाणवत होती.
राष्ट्रपती म्हणाल्या की, ही अभिमानाची बाब आहे की, ब्रह्मकुमारी संस्था गेली सुमारे 80 वर्षे आध्यात्मिक प्रगती, व्यक्तिमत्त्वातील आंतरिक परिवर्तन आणि जागतिक समुदायाच्या पुनरुज्जीवनासाठी अमूल्य योगदान देत आहे.
शांतता, अहिंसा आणि प्रेमावर आधारित सेवेच्या भावनेतून या संस्थेने, सर्वांगीण शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य, महिला सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन, दिव्यांगजन आणि अनाथांचे कल्याण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भरीव योगदान दिले आहे. या उदात्त कामांसाठी त्यांनी ब्रह्मकुमारींची प्रशंसा केली.
ब्रह्मकुमारी संस्था 137 देशांमध्ये सुमारे 5000 ध्यान केंद्रे चालवत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. त्या म्हणाल्या की, आध्यात्मिक बांधवांच्या सहयोगाने या संस्थेत महिलांची प्रमुख भूमिका राहिली आहे. महिलांनी चालवलेली ही सर्वात मोठी आध्यात्मिक संस्था आहे जी हे सिद्ध करते की, संधी दिल्यावर, स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने किंवा कदाचित त्याहूनही अधिक चांगले काम करू शकतात. ब्रह्मकुमारी संस्थेने महिला सक्षमीकरणात सक्रिय भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महिलांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि बौद्धिक सबलीकरणातच जगाचा सर्वांगीण विकास सामावलेला आहे, यावर ब्रह्माबाबांचा विश्वास आहे. या विचाराने ब्रह्माबाबांनी महिलांना प्रमुख भूमिका दिल्या आणि आजच्या जागतिक समाजाला अशाच विचारसरणीची अधिक गरज असल्याचे त्या म्हणाल्या.