
नोटबंदी हे आर्थिक हत्याकांड; संजय राऊत
मुंबई: देशात नोटबंदीनंतर हजारो मृत्यू झाले. हजारो लोक बँकेच्या रांगेत मरण पावले. लाखो लोकांना रोजगार गमावावा लागला. लाखो लोकांचे अतोनात हाल झाले. नोटबंदी हे आर्थिक हत्याकांड होते, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
नोटबंदीबाबतच्या याचिकांवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा हा निर्णय योग्य होता, असा निर्णय दिला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली. नोटबंदी योग्य की अयोग्य ? या पेक्षा नोटबंदीच्या निर्णयामुळे जे आर्थिक हत्याकांड झालं त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न महत्वाचा आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक ८ नोव्हेंबर २०१६ ला आज रात्रीपासून एक हजार आणि ५०० रूपयांच्या नोटा बाद झाल्याचे जाहीर केले. काळा पैसा बंद होईल, दहशतवाद्यांची रसद बंद होईल, अतिरेक्यांना पैसे पुरवणं बंद होईल, चलनातल्या बनावट नोटा संपुष्टात येतील यासाठी आपण ही नोटबंदी करत आहोत अशी सगळी कारणं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. मात्र बनावट नोटांचें प्रमाण वाढले आहे. काश्मीरसह देशभरात दहशतवाद संपलेला नाही. त्यांना करण्यात येणारे टेरर फंडिंग सुरूच आहे असेही संजय राऊत म्हणाले. नोटबंदीनंतर काळा पैसा जास्त प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नोटबंदी योग्य कशी? त्यामुळे जस्टिस नागरत्ना यांनी जे मत मांडले ते योग्य मत आहे. आम्ही त्या एका मताच्या बाजूने आहोत. नोटबंदी हे आर्थिक हत्याकांड आहे. या हत्याकांडाला जबाबदार कोण ?असा सवाल संजय राऊत यांनी केला.