शोधू या अश्रूचे संदर्भ….जाणीव नेणिवेच्या पलिकडे जाऊन….!

शोधू या अश्रूचे संदर्भ….जाणीव नेणिवेच्या पलिकडे जाऊन….!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्य परीक्षण_

अगं, अगं, किती किती ही बडबड…. धबधबा कोसळल्यागत…ब्रेक नसलेल्या गाडीसारखी सुसाट पळतेस…आज मन उगाचच स्वतःला आतल्या आत आवरत होतं…पण जिव्हा थांबतच नव्हती…मनातलं मळभ दूर सारत होती. निरभ्र आकाशात चंद्राचे विलोभनीय दर्शन व्हावे तसे तिचे मुखकमल उजळ भासत होते आणि गालावरून मात्र अश्रू ओघळत होते. त्या अश्रूंचे संदर्भ होते उत्कट आनंदाचे.
जीवाभावाच्या सवंगड्यांशी अचानक भेट व्हावी… ख्यालीखुशाली विचारता विचारता भूतकाळातील आनंदी क्षणांना उजाळा द्यावा आणि नकळत अश्रूंचे दोन मोती गालावरून ओघळावे. काय संदर्भ ना या अश्रूंचे…? हरवलेल्या क्षणांना पुन्हा नव्याने जगण्याचा अट्टाहास की जे हरवले त्याच्या विरहाचा दुःखाहास…अर्थातच अश्रू येतातच भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी… सुख-दुःखाच्या विणीला अधोरेखित करण्यासाठी…मात्र कधी कधी कुणी अश्रूंचेही संदर्भ जाणत नाही आणि कुणी अंतरंगातील आक्रंदनही नजरेतून वेचून घेई…!

या ठिकाणी मला एक घटना प्रकर्षाने आठवते…तसं तर मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही पण वडिलांच्या मृत्यूनंतर सचिन तेंडुलकरांचे भावविभोर होणे मनाला चटका लावून जाणारे. वडिलांच्या मृत्यूनंतर फक्त दोन दिवसांनी शतकी खेळी करून आकाशाच्या दिशेने बॅट उंचावत आपल्या वडिलांना शतक अर्पण करण्याचा तो प्रसंग खरेतर संमिश्र भावनांचा…. एकीकडे शतक केल्याचा आनंद तर दुसरीकडे दिवंगत पित्याची स्मृती जपत मनात उठलेले आक्रंदन शांतावण्याचा प्रसंग…खरेच कुठले संदर्भ द्यावेत या अंतरंगात वाहलेल्या अश्रूंना…?

मानवी मन म्हणजे न उकलणारे कोडे…म्हणूनच कवयित्री बहिणाबाई सरळ देवालाच सवाल करतात…
देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं.
कुठे जागेपनी तूले..
असं सपनं पडलं ..!

अशा या मनामध्ये विचारांचे हिंदोळे सतत चालू असतात. कधी घुसमट तर कधी आसवांच्या धारा वाहतात…या धारांचे संदर्भ माणूस आपापल्या परीने लावत असतो. ह्याच अश्रूंच्या संदर्भाचा शोध घेण्यासाठी मराठीचे शिलेदार कविता चारोळी समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने ‘अश्रूंचे संदर्भ ‘ हा विषय माननीय राहुल पाटील यांनी दिला. अतिशय सुंदर भावोत्कट रचनांमधून आपण सर्व व्यक्त झालात. अश्रू म्हटले की, आपसूकच दुःख, दारिद्र्य, अपमान, अवहेलना, स्त्री-पुरुष असमानता, शहिद वीरांच्या मातेचे अश्रूंवाटे आक्रंदन, मानवी समाज आदिम अवस्थेत असताना भाषेच्याही आधी भावनांची देवाणघेवाण होण्यात अश्रूंचा वाटा… आणि चराचरातील वृक्षवल्ली हेही ढाळत असतील का अश्रू असा संदर्भ शोधणारे तरल कवीमन…तर कुणी अश्रूंचे संदर्भ समजून न घेतल्याने मातीत मिसळून मातीमोल झालेले दुर्दैवी अश्रू…. त्याचबरोबर आईपणाच्या प्रसववेदना सोसून इवल्याशा जीवाला बघताच आलेले आनंदाश्रू….असे कितीतरी संदर्भ ना अश्रूंना…. सहभागी सर्व शिलेदारांचे अभिनंदन…लिहित राहा व्यक्त होत राहा हीच शुभकामना…!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
मुख्य परीक्षक, कवयित्री/लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles