Home कोकण “माणुसकी अजून जिवंत आहे”; स्वाती मराडे

“माणुसकी अजून जिवंत आहे”; स्वाती मराडे

51

“माणुसकी अजून जिवंत आहे”; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोड बोलून स्वतःच्या नावावर घर घेतले करून व मुलाने काढले वडिलांना घराबाहेर..
लहान बाळासह दांपत्याचा अपघात.. मदतीवाचून वेळेवर मिळाले नाहीत उपचार..
कचराकुंडीत सापडले नुकतेच जन्मलेले अर्भक..
यांसारख्या बातम्या वाचल्या की वाटते माणुसकी लोप पावत चाललीय की काय..आजारी वयोवृद्ध बाप..थरथरत्या हाताने व‌ लटपटत्या पायाने कुठे जाणार की भीक मागणार.. मुलगा म्हणून तर नाहीच पण माणूस म्हणूनही कीव न यावी.. अपघात पहायला बघ्यांची गर्दी होते.. पण मदतीचा हात कुणाचाच नाही मोबाईल कॅमेरे आॅन अन् मनाची दारे बंद.. जन्म देऊन पोटचा गोळा उकिरड्यावर बेवारस सोडताना हृदयाला पीळ पडतच नसेल का? हे सगळं पाहिलं की वाटतं..!

*माणसा माणसा कधी होशील माणूस*
*लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस*

बालवयातलं निरागसपण संपून.. जगरहाटीत मिसळताना.. लबाडी, चोरी, फसवेपणा, स्वार्थ.. या सर्वांच्या आहारी माणूस कसा जातो नि स्वतःतलं माणूसपण हरवून बसतो.. हरवून जातो मानव आत शिरतो दानव.. अन् पुन्हा तोच शोध घेत राहतो माणुसकीचा.. माणुसकीचा सुद्धा देखावा निर्माण झालाय असेही वाटते कधीकधी.. घरात आई-बाप न सांभाळणारा वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा करतो.. याशिवाय मदत केलेले फोटो काढ व टाक सोशल मिडीयावर.. हीच का ती माणुसकी..!
जगात अनेक शोध लागले, अंतराळात झेप घेतली पण माणुसकी शोधायला मात्र अंतरंगातच डोकवावे लागेल. का बरे माणसाची ओळख त्याच्या चांगल्या कर्मावरून होऊ नये.. की त्यासाठीही देवाकडेच मागणे मागावे लागेल.

*हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे*
*माणसाने माणसाशी माणसांसम वागणे..*

पण नाण्याला दोन बाजू असतातच.. एखाद्या झाडाला काटे असतीलही पण काही झाडे मधुर फळे, सुगंधी फुले देतातच ना.. कुठे पाणी साचून त्याचे डबके होते पण कुठे स्वच्छ पाणी कुणाची तरी तहान भागवतेच ना.. अंधार असतोच पण त्यातही चांदणे डोकावतेच ना.. ऊन्हाचे चटके सहन होत नाहीत तेव्हाच एखादं झाड थंडगार सावली देत असतेच ना.. असंच काहीसं चित्र समाजात वावरताना दिसते. हो आहेत पोटच्या मुलांना टाकून देणारे पण अनाथांची माय होणारेही आहेत.. बसमध्ये दिसलाच एखादा अपंग, वृद्ध तर स्वतः उभे राहून जागा देणारेही आहेत.. पूर, भूकंप, नैसर्गिक आपत्तीत मला कुठलंच नुकसान झाले नाही मला काय करायचं त्याचं असा विचार करणारे आहेत तसेच मदत करणारे शेकडो हातही आहेत‌.. वृद्धाश्रम चालवणारी संवेदनशील मनेही आहेत.. होय चांगुलपणा जिवंत आहे.. माणुसकी जिवंत आहे..!
परोपकारी माणसे अजूनही आहेत.. पण ती केवळ बोटावर मोजण्याइतकी नसावीत.. माणुसकीची ही ज्योत हृदयाह्दयात जागावी.. माणूसपण जपण्याची ही ओढ हरएक मनास लागावी. सहज जाता जाता दररोज एकतरी सत्कर्म माझ्या हातून घडावं असं‌ ठरवलं तर माणुसकीच्या शोधात इतरत्र भटकण्याचीही गरज उरणार नाही.

आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी ‘माणुसकीच्या शोधात’ हा विषय आला. अंतरंगातून शोध घेण्याचा आपणा सर्वांचा शाब्दिक प्रयत्न अप्रतिमच. माणुसकीची कदर.. निस्वार्थी मदतीचा हात.. संवेदनाशून्य मनात.. हाडामासाच्या पुतळ्यात संवेदना जागवण्यासाठीचा शाब्दिक जागर.. माणुसकीचा शोध घेण्यासाठी मनाला साद घालून गेला. असेच लिहीत रहा व्यक्त व्हा या शुभेच्छांसह सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐

स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, लेखिका, कवयित्री